भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत करणाऱ्या टीकेचं समर्थन केलं असून एकटं पडण्याची भीती गुलामांना असते असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा त्रास झाला म्हणून मी त्यांचं नाव घेतो. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सरकार आलं नाही असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे यांच्यावर सुनील नेवे यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

खडसे यांनी यावेळी म्हटलं की, “मी कधीही पक्षाच्या विरोधात बोललो नाही. देवेंद्र फडणवीस यांचा त्रास झाला म्हणून मी फक्त त्यांचं नाव घेतो. यांच्यामुळेच सरकार आलं नाही. मला अनेकजण बोलू नका असं सांगतात. पण चुकीच्या निर्णयाचा विरोध करण्याची धमक ज्यांच्यात असते तेच स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. एकटं पडण्याची भीती गुलामांना असते”.

देवेंद्रजींकडून त्रास झाला म्हणून बोललो; एकनाथ खडसेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा

“आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल खडसे यांनी केला असून, लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा केली. “सगळे म्हणतात नाथाभाऊ चांगले, मग तिकीट का दिले नाही? मुख्यमंत्री होऊ शकलो नाही याचं दुःख नाही. उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही,” अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. “नाथाभाऊ अन्याय सहन करणार नाही. स्वस्थ बसणार नेता नाही. मला न्याय मिळत नाही तो पर्यंत मी पक्षाला प्रश्न विचारणार आहे,” असं खडसेंनी यावेळी म्हटलं.