मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची व्यूहरचना

सांगली : चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता असलेली महापालिका ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस पराभवातून सावरण्यापूर्वीच भाजपने लोकसभा आणि विधानसभेची तयारी सुरू केली आहे. भाजपवर शाब्दिक प्रहार करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना वाळवा विधानसभा मतदारसंघातच गुंतवून ठेवण्याची भाजपची रणनीती आहे.

सांगली महापालिकेची काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवण्यात आणि जमले तर सत्तेत सहभागी होण्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वप्न मोडीत काढत भाजपने अखेर पालिकेची सत्ता एकहाती हस्तगत केली. आता भाजपने लोकसभेची तयारी सुरू केली असून, याचबरोबर जयंत पाटील यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची व्यूहरचना आखली आहे. यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असताना काँग्रेस आघाडीवर मात्र, अद्याप सामसूमच आहे.

दोन्ही काँग्रेस आघाडीची महापालिकेत सत्तेत येणार आणि राज्य पातळीवर आघाडीचा चांगला संदेश जावा, अशी मानसिकता जयंत पाटील यांची असताना स्वतच्या घरातच भाजपने मात देत या मनसुब्यावर पाणी फिरवले. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला ४१ जागा तर आघाडीला ३५ जागा मिळाल्या असून, एक अपक्ष आणि एक स्वाभिमानी विकास आघाडीचे सदस्य आहेत. बंडखोरीमुळे आघाडीचा पराभव झाल्याचा निष्कर्ष राष्ट्रवादीने काढला असला तरी याबाबत काँग्रेस मात्र अद्याप कोमातच असल्याचे दिसत आहे. आघाडी होणे ही जशी राष्ट्रवादीची गरज होती तितकी तातडी काँग्रेसची नसल्याने याचा नेमका लाभ भाजपला झाला.

महापालिका निवडणुकीनंतर आता लोकसभा आणि एकत्र झाल्या तर विधानसभा निवडणुकीचे वेध लागणे स्वाभाविकच आहे. आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगली लोकसभा काँग्रेसकडे तर, सांगली व मिरज या दोन विधानसभेच्या जागा या काँग्रेसच्या वाटय़ाला असल्या तरी या दृष्टीने मोच्रेबांधणीसाठी काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू करायला हवी होती. मात्र, तसे कोठेही दिसत नाही. लोकसभेपेक्षा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विधानसभा महत्त्वाची वाटत असल्याने त्या दिशेनेच मोच्रेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

सांगली जिल्हा जसा काँग्रेसचा बालेकिल्ला तसा राष्ट्रवादीचाही बालेकिल्ला म्हणावा लागेल. मात्र, गेल्या लोकसभेला सर्वात जास्त आउटगोइंग हे राष्ट्रवादीतूनच झाले आहे. याला कारणही राष्ट्रवादीच्या घरातीलच नेते मंडळीचे असल्याचे स्पष्ट दिसून येते. आज भाजपची वाढलेली ताकद ही प्रामुख्याने राष्ट्रवादीतून आलेल्यांची गर्दीच आहे. काँग्रेसला ज्या वेळी मदतीची गरज असेल त्या वेळी एक आणि स्वतला गरज असेल तर आघाडीचा धर्म ही भूमिकाच राष्ट्रवादीने आतापर्यंत घेतली असल्याने त्याची फळे मिळू लागली आहेत.

आमदार जयंत पाटील हे अभ्यासू आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये १५ वर्षे काम केलेले नेतृत्व आहे. मात्र, जिल्हा नेतृत्वाच्या स्पर्धेत ते आले की, काँग्रेसकडून त्यांची कोंडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. याला कारणही त्यांची आतापर्यंतची बेरीज-वजाबाकीची गणितेच म्हणावी लागतील. अगदी २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून मागोवा घेतला तरी याची प्रचिती येते. याच्या मागे जिल्ह्यात वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष हाच मूळ पाया मानला जातो आहे. यासाठी काँग्रेसच्या विचारावर श्रद्धा असलेले मतदार मात्र, दिशाहीन होत गेला. परिणामी पक्षवाढीसाठी भाजपला आयती मशागत केलेली जमीन मिळाली. पडद्याआडच्या खेळामुळेच आज दोन्ही काँग्रेसची सत्तास्थाने भाजपला काबीज करणे सहजसाध्य बनत चालले आहे.

इस्लामपूर नगरपालिकेत भाजपची सत्ता असली तरी वाळवा पंचायत समितीसह अनेक गावातील ग्रामपंचायतीध्ये आमदार पाटील यांच्या गटाकडे सत्ता आहे. यामुळे जयंत पाटील यांचे आजघडीला प्राबल्य दिसत असले तरी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. बागणी जिल्हा परिषद गटातून शिंदे गटाचे वैभव शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळूनही त्यांचा बंडखोर संभाजी कचरे यांच्याकडून झालेला पराभव पाटील यांच्या रणनीतीचा भाग मानला जात असला तरी याचे दूरगामी परिणाम आगामी निवडणुकीवर होणारच नाहीत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. याचबरोबर येलूरचे महाडिक, वाळव्यातील हुतात्मा समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांच्याशी असलेले दुराव्याचे संबंध, शिराळ्यातील वाघ आणि नाग यांच्यातील पारंपरिक लढत वाळव्याच्या राजकीय पटलावर परिणाम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुने आणि नवे हिशेब चुकते करूनच जयंत पाटील यांना पुढील दिशा निश्चित करीत असताना बेरजेचे राजकारण करावे लागत आहे. याची मोच्रेबांधणी म्हणून पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या खासदार राजू शेट्टी यांच्याशी केलेली वाढती जवळीक हा त्याचाच एक भाग आहे. शत्रूचा शत्रू तो मित्र हीच भूमिका यामागे आहे. वाळव्यात प्राबल्य कायम राखत असतानाच जिल्हा स्तरावर भाजपशी दोन हात करीत असताना काँग्रेसच्या मंडळींनाही ज्येष्ठत्वाचा सल्ला द्यावा लागणार आहे.

सदाभाऊ खोत यांची मदत

* महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जयंत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. राज्यात पुन्हा सत्ता हस्तगत करणे हे पक्षाचे ध्येय असून यासाठी पाटील यांना राज्यभर प्रचारासाठी फिरावे लागणार आहे.

* मात्र, त्यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना सोबतीला आहेच.

* पण त्याचबरोबर इस्लामपुरातून थेट निवडून आलेले नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांनाही भाजपने विधानसभेचा चेहरा म्हणून पुढे केले आहे. यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांनाही भाजपमध्ये आणले आहे.