मनासारखे पद न मिळाल्यास भाजपांतर्गत सामाजिक ध्रुवीकरण?

लोकसत्ता, प्रशांत देशमुख

वर्धा : जातीय अल्पसंख्याकांना जोडण्याच्या भाजपच्या धोरणातून जिल्हा परिषदेतील सत्तांतर झाल्याने अस्वस्थ झालेल्या बहुजन समाजातील नेत्यांचे लक्ष आता सभापतीपदांकडे लागले असून मनासारखे वाटप न झाल्यास भाजपांतर्गत नवेच सामाजिक ध्रुवीकरण होण्याची नांदी आहे.

वर्धा जिल्हा परिषदेस स्पष्ट बहुमत असणाऱ्या भाजपला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सदस्यांची निवड करताना तारेवरची कसरत करावी लागली. मात्र तरीही त्याचे तीव्र पडसाद लगेच उमटले. अध्यक्षपदाची दावेदारी नाकारल्या गेल्याने आष्टी तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयावर धडक मारीत नाराजी नोंदवली. ओबीसी महिलेसाठी राखीव असलेल्या अध्यक्ष पदासाठी भाजपकडे असलेल्या दहा दावेदारांपैकी पाच सदस्य केचे गटाकडे होते. गटाने अध्यक्षपद नाकारण्याची भूमिका पुढे केल्याने उर्वरित पाचपैकी गफोट व कलोडे यांची नावे मागे पडली. श्रीमती माटे पोट निवडणुकीत प्रथमच निवडून आल्याने त्यांचा विचार झाला नाही. श्रीमती विमल वरभे यांचे नाव तेली समाजास प्राधान्य म्हणून घेण्यात आल्यानंतर पक्षनेते मिलिंद भेंडे यांच्याच हातात सत्ता जाण्याची चाहूल लागल्यावर नाव मागे पडले. देवळी तालुक्यातील सुनीता राऊत यांच्या बाबतीत तांत्रिक बाब उपस्थित झाली. असा घोळ होण्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदी सरिता गाखरे यांची निवड झाली. त्या काटोल निवासी असून पक्षाला त्यांच्या पदाचा काय फोयदा होणार, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र ही वेळेवरची निवड आमदार दादाराव केचे यांना नाईलाज म्हणून करावी लागली. त्यांच्या गटात चुरस असल्याने त्यांनी अध्यक्षपदाऐवजी दोन सभापतीपदांवर केलेला दावा फे टाळण्यात आल्याने मतदारसंघातील जातीय संतुलन राखण्यासाठी भोयर पवार समाजास प्राधान्य दिले. ही बाब त्यांच्याच गटात खटकली. उपाध्यक्षपदी वैशाली येरावार यांना पसंती मिळाली. माजी मंत्री व आमदार मदन येरावार यांच्या कुटुंबातील असलेल्या श्रीमती येरावार यांना गतवेळीच आश्वासन मिळाल्याचे सांगण्यात आले. पक्षांतर्गत सूत्रानुसार यावेळी उपाध्यक्षपद आमदार समीर कुणावार गटाकडे होते. त्यांच्या गटातील सर्वात ज्येष्ठ सदस्य माधव चंदनखेडे यांचा दावा राहण्याचा पार्श्वभूमीवर कुणावार यांनीही श्रीमती येरावार यांच्या नावाला संमती दिल्याची चर्चा झाली.

महत्त्वाच्या दोन गटावर अशा छोटय़ा समाजघटकातील सदस्यांची वर्णी लागल्याने आता उर्वरित चार सभापतीपदांसाठी जिल्हय़ातील मातब्बर म्हटल्या जाणाऱ्या कुणबी- तेली समाजातील सदस्यांचे डोळे लागले आहे. भाजपचा मित्रपक्ष रिपाइंचे विजय आगलावे यांची वर्णी निश्चित समजल्या जाते. कुणावार गटाकडून श्रीमती माटे व माधव चंदनखेडे तर आमदार डॉ. पंकज भोयर गटात चुरस आहे. विनोद लाखे, सरस्वती मडावी यांची नावे असून आमदार विरोधक समजल्या जाणाऱ्या पंकज सायंकार व नूतन राऊत यांची नावे श्रेष्ठींकडून येण्याची शक्यता व्यक्त होते. सभापती पदासाठी निवड करताना भाजपच्या कोअर समितीत जातीय ध्रुवीकरणावरच काथ्याकूट होण्याची चिन्हे आहेत.