महापालिकेत सत्ता मिळूनही गटबाजीने विकासकामे रखडली; मंत्र्यांमध्ये मतभिन्नता, पालिकेतील कारभाऱ्यांमध्येही वाद

सोलापूर : वर्षांनुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात असलेली सोलापूर महापालिकेची सत्ता भाजपने ताब्यात घेऊन दीड वर्षांचा कालावधी लोटला तरी कारभार चालविताना सत्ताधारी म्हणून भाजपला अद्यापि सूर सापडेनासा झाला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख व  पालकमंत्री विजय देशमुख यांना आपापसांत भांडणे करायला पक्षश्रेष्ठींनी जणू मोकळीकच दिली की काय, अशी शंका सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत असतानाच त्याचे प्रतिबिंब महापालिकेच्या कारभारावर पडले नाहीत तरच नवल वाटावे. किंबहुना, महापालिकेत सत्ताधारी असूनही भाजपच्या कारभाराची पध्दती विरोधकांनाही लाजविणारी ठरावी, अशीच दिसून येत आहे. पाणीपुरवठा प्रश्नावरून सत्ताधारी सभागृहनेत्याने केलेले बेजबाबदार वर्तन हे त्याचेच द्योतक ठरते. दोन्ही मंत्री देशमुख जोपर्यंत एकमेकांच्या विरोधात शह-प्रतिशहाचे राजकारण खेळतात, तोपर्यंत महापालिकेच्या कारभारातही गोंधळाचीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेसच बरी होती, हे आता सामान्य सोलापूरकर उघडपणे बोलू लागले आहेत.

‘स्मार्ट सिटी’ होऊ घातलेल्या सोलापूर शहरात अंतर्गत जलवितरण प्रणाली जुनी व कालबाह्य़ झाल्याने गेल्या १५-१६ वर्षांपासून नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. उजनी धरणातून प्रमाणापेक्षा दहा पटींनी जास्त म्हणजे तब्बल २ टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा उपसा होऊनदेखील दहा लाख लोकसंख्येच्या सोलापुरात कधी तीन ते चार दिवसाआड, तर कधी पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. अलीकडे उजनी धरण-सोलापूर थेट जलवाहिनी योजनेच्या दुरुस्तीचे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खरे तर पालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या निधीतून उजनी जलवाहिनी योजनेची दुरुस्ती झाल्यानंतर पाणी उपशामध्ये ७२ लाख लिटर पाण्याची वाढ झाली आहे. ही जमेची बाजू असताना सत्ताधारी म्हणून कौतुकाची थाप मारणे तर दूरच राहिले, परंतु गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या कारणावरून सभागृहनेते संजय कोळी यांनी महाापालिकेतील पाणीपुरवठा अधिकारी संजय धनशेट्टी यांना आपल्या स्वत:च्या प्रभागात भवानीपेठेत बोलावून घेतले आणि नागरिक व कार्यकर्त्यांच्या गर्दीत कोळी यांनी गढूळ पाणीपुरवठय़ाबद्दल जाब विचारत एका तृतीयपंथीयाच्या हातून पाणीपुवरठा अधिकारी धनशेट्टी यांचा पुष्पहार घालून सत्कार घडवून आणला.

शासनाकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले संजय धनशेट्टी हे अनुभवी अभियंता म्हणून गणले जातात. गढूळ पाणीपुरवठय़ाबद्दल सत्ताधारी पक्षाचे सभागृहनेते म्हणून संजय कोळी यांना प्रशासनाला जाब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे. हा अधिकार योग्य प्रकारे कायद्याच्या चाकोरीतून वापरणे अपेक्षित होते. परंतु आपण सत्ताधारी आहोत की विरोधक, याचाच नेमका विसर पडला म्हणून की काय, सभागृहनेते कोळी यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्याचा एका तृतीयपंथीयामार्फत सत्कार घडवून आपल्या बेजबाबदार व हिणकस कार्यसंस्कृतीची ओळख करून दिली आहे. मानहानी झाल्याने मनस्ताप झालेले पाणीपुरवठा अधिकारी धनशेट्टी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली. त्याला चार-पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही व गुन्हा नोंद केला नाही. यात पोलीस यंत्रणा किती कार्यक्षम आहे हेदेखील कळून चुकले आहे. याप्रकरणी महापालिकेचे कार्यक्षम समजले जाणारे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणे अपेक्षित होते. महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी संघटनेनेने पुढे येऊन पाणीपुरवठा अधिकारी धनशेट्टी यांना न्याय देण्याची मागणी उचलून धरली आहे.

या पाश्र्वभूमीवर महापालिकेत एकंदर सत्ताधारी भाजपचा चाललेला कारभार पाहून याच पक्षाचे यापूर्वी चार वेळा नगरसेवक राहिलेले विश्वनाथ बेंद्रे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया गंभीर स्वरूपाची आहे. थेट सभागृहनेतेच जर एखाद्या प्रश्नाची सोडवणूक योग्य कायदेशीर अधिकाराने न करता पाणीपुरवठा अधिकाऱ्याचा तृतीयपंथीयाच्या हातून सत्कार घडवून आणत असतील तर महापालिकेच्या कारभारात आलेले त्यांचे अपयश आहे. त्यामुळे आता महापालिकेचा कारभारच तृतीयपंथीयाच्या हाती देणे श्रेयस्कर ठरणार आहे, अशा जहाल शब्दात बेंद्रे यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना ‘घरचा आहेर’ दिला आहे.

अभ्यासूवृत्तीचा ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून यापूर्वी महापालिका गाजविलेले बेंद्रे यांचे हे खडे बोल समस्त सोलापूरकरांच्या मनातील बोल आहेत. महापालिकेची सत्ता हाती जशी आली, तशी सोलापुरात सत्ताधारी भाजपमध्ये भांडणे सुरूच आहेत. या भांडणात विकासाची कामे थांबली आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाच्या शोभा बनशेट्टी विरुद्ध पालकमंत्री विजय देशमुख यांच्या गटाचे सभागृहनेते संजय कोळी यांच्यातील ‘कलगीतुरा’ मध्यंतरी रंगला होता. तो अलीकडे काहीसा थांबलेला असला तरी उभयतांमधील गटबाजी थांबली नाही. सुदैवाने महापालिकेत डॉ. ढाकणे यांच्या माध्यमातून कार्यक्षम आयुक्त लाभले आहेत. त्यांनी काही निर्णय महापालिकेच्या हिताचे घेतले आहेत. महापालिकेच्या मालकीच्या व्यापारसंकुलातील १३२६ लहान-मोठय़ा गाळ्यांचे फेरलिलाव करून पालिकेचे उत्पन्न वाढविण्याची कायदेशीर भूमिका आयुक्तांनी शासनाच्याच आदेशाने अंगीकारली असताना त्याला खो घालण्याच्या प्रयत्नांमध्ये सत्ताधारी भाजपच आघाडीवर राहिला आहे. शहराच्या सर्वागीण विकासासाठी नव्हे तर व्यापाऱ्यांशी असलेले हितसंबंध जोपासण्यासाठी महापालिकेची सत्ता मिळाली आहे, असाच काहीसा भाजपचा गोड गैरसमज झालेला दिसतो. अशी एक ना अनेक उदाहरणे सापडतात. या गोंधळी कारभाराचे मूळ दोन्ही मंत्री देशमुखांच्या वादात सापडते. गेल्या महिन्यात झालेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही मंत्र्यांनी एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेत सत्तासंघर्ष केल्याचे सर्वानी पाहिले आहे. या भांडणाला लगाम घालण्यासाठी यापूर्वी नाही म्हणायला एकदा स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही देशमुखांची झाडाझडती घेतली होती, परंतु त्याचा प्रभाव नंतर काही दिवसांतच निवळला. महापालिकेत सत्ताधारी म्हणून भाजपची गुणवत्ता वरचेवर पार घसरत चालली आहे.