जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्यामुळे युतीबाबत प्रश्नचिन्ह

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपने जिल्ह्य़ातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर करून शिवसेनेवर दबावतंत्र अजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या शिबिरात खुद्द जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या धोरणाचे सूतोवाच केल्याने युतीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणुकीत आतापर्यंत दोन्ही पक्षांनी युती करून विरोधकांशी लढा दिला आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढल्यानंतर स्थानिक पातळीवरील वाद विकोपाला गेले आहेत. त्यातच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारचा ‘टीआरपी’ वाढत गेल्याने भाजपच्या वाढीसाठी जिल्ह्य़ात आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या पाश्र्वभूमीवर २५ वर्षांपूर्वी शिवसेनेशी युती केल्याने रत्नागिरी जिल्ह्य़ात भाजपची वाढ थांबून त्याचे बोन्सायमध्ये रूपांतर झाल्याचे खुद्द माने यांनी स्पष्ट केले आहे, पक्षाचे पुन्हा वृक्षामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टीने आता स्वत:ची ताकद सिद्ध करणे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रभाव वाढवणे हे उद्दिष्ट बाळगायचे असून, जिल्ह्य़ातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी या शिबिरात स्पष्ट केले. दापोली येथे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे दोन दिवसीय शिबीर नुकतेच पार पडले. वर्षअखेरीस होणाऱ्या नगरपंचायत निवडणुका आणि त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या शिबिरात भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. जिल्ह्य़ातील भाजपचे मातब्बर नेते बाळ माने यांची पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच जिल्हास्तरीय बठक होती. त्यामुळेदेखील या बठकीला महत्त्व निर्माण झाले होते. बाळ माने यांनी शिवसेनेशी असलेला स्थानिक पातळीवरील वाद सर्व कार्यकर्त्यांसमोर उघड करत निवडणुकांसाठी तयारीला लागण्याची सूचना केली.

बाळ माने यांच्या वक्तव्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढण्यास मदत झाली असून, दुसऱ्या बाजूला शिवसेनेवर राजकीय दबाव आणण्यातही यश आले आहे.