विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा (डोरमंट अकाऊंट) गोपनीय डाटा बेकायदेशिर मार्गाने मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. एका आंतरराज्य टोळीला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं. याप्रकरणात नऊजणांना अटक करण्यात आली असून, भाजपा चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष रोहन मंकणीचाही समावेश आहे. त्याचबरोबर या टोळीत चार संगणक अभियंत्यांचा समावेश आहे.

आरोपींनी संगनमत करून बँकांमधील निष्क्रीय खाते (डोरमंट अकाऊंट) आणि काही बँक खात्यांची माहिती मिळवली होती. या खात्यात दोन अब्ज सोळा कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपये एवढी रक्कम होती. आरोपी रोहन मंकणी यांना डाटा विक्री करून त्याबदल्यात त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळवणार होते, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेला मिळाली होती.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील सुधीर भटेवरा यांच्याकडून पैसे घेण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले. आरोपींकडून पंचवीस लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

याप्रकरणी राज्यातील नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपा चित्रपट आघाडी शहराध्यक्ष रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४, रा. अंबेजोगाई, जि. बीड), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय ३४, रा. मुंबई), मुकेश हरिश्चंद्र मोरे (वय ३७, रा. येरवडा), विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम), सुधीर शांतिलाल भटेवरा (वय ५४, रा. सिंहगड रस्ता), राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद), परमजितसिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद), अनघा अनिल मोडक (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी यासंदर्भात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणात अटक करण्यात आलेले चौघे आरोपी संगणक अभियंता आहेत.