भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापुरला जाणार असल्याचं म्हटलं होतं. यानतंर राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खुलासादेखील केला होता. मात्र आता भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी तोच धागा पकडत आम्ही चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून निवडून आणू असं म्हटलं आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
“चंद्रकांत पाटील तर म्हणाले की मी पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढवणार. त्यामुळे मी एकच सांगतो की, त्यांनी तेथून निवडणूक लढवल्यास त्यांच्या निवडणुकीचा प्रचारप्रमुख मीच असेन आणि त्यांना आम्ही निवडून आणू. एवढंच लक्षात ठेवा,” अशी भूमिका संजय काकडे यांनी मांडली आहे.
माजी खासदार संजय काकडे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही ठिकाणच्या नामांतराबाबत बोलताना सांगितलं की, “राज्यात करोनामुळे मागील दहा महिन्यांपासून अनेक तरुणांच्या हातचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे. पण हे सरकार औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही ठिकाणांचे नामांतर करण्याकडे लक्ष देत आहे. या मोठ्या नेत्यांनी नामांतर विषय बाजूला ठेवून प्रथम तरुणांना रोजगार द्यावा. नामांतर केल्याने काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी एखादी समिती नेमावी आणि ती समिती त्यावर काम करेल”. महाविकास आघाडीच्या कामकाजावर बोलताना ते म्हणाले की, “राज्य सरकार स्थिर दिसत आहे. मी काही भविष्य सांगू शकत नाही”.
आमचे कोणतेही नगरसेवक पक्षांतर करणार नाही : संजय काकडे
“प्रत्येक पक्षात काही प्रमाणात नाराजी असते. त्यातच आज भाजपाचे १९ नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. एकच सांगतो की, आमचे भाजपाचे ९८ नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. काही जण अफवा पसरवत आहेत. निवडणुका जवळ आल्या की, अशा चर्चाना सुरुवात होत असते,” असं संजय काकडे यांनी म्हटलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 5:47 pm