सांगली महानगरपालिका निवडणूक

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळण्यात काँग्रेस व राष्ट्रवादीतील बंडखोरीही लाभदायक ठरली. यामुळेच बंडखोरीचा फटका बसल्याची कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना द्यावी लागली.

सांगली महापालिकेची भाजपने एकहाती सत्ता मिळवत असताना काँग्रेसचा गड नेस्तनाबूत केला. महापालिका स्थापन झाल्यापासून गेल्या दोन दशकांत महापालिकेबाहेर असलेल्या भाजपला सत्ता मिळविण्यात गेल्या दोन वर्षांपासूनचे भाजपचे निवडणूक नियोजन जसे महत्वाचे ठरले तसे काँग्रेस-राष्ट्रवादीतील उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेली नाराजीही फायदेशीर ठरली.

महापालिका निवडणुकीमध्ये कुपवाडमधून काँग्रेसचेच बंडखोर गजानन मगदूम आणि ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारीवर विजयी झाले. अन्य प्रभागात अपक्षांना विजय मिळविता आला नसला तरी आघाडीच्या मतामध्ये हिस्सेदार झाल्याने भाजपचा विजय सुलभ झाला आहे. याचा फटका आघाडीच्या जागा कमी होण्यात आणि भाजपच्या जागा वाढण्यात झाला. भाजपने झिरो ते हिरो बनत असताना गेली दोन महिने गल्ली पातळीवर केलेले नियोजन लाभदायी ठरत असताना आघाडीतील उमेदवारी वाटपातील सावळागोंधळ पथ्यावर कसा पडेल याकडे लक्ष दिले.

आमदार जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच अगदी त्यांच्या घरच्या रणांगणात कसे यश मिळते याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. यामुळे महापालिकेत आघाडी सत्तेवर येणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले  होते. यासाठी त्यांनी प्रत्येक प्रभागांमध्ये अगोदरच बठकांचा धडाका लावण्यात आला होता. या तुलनेत काँग्रेसचे नेते गल्लीबोळात फारसे उतरलेच नाहीत. काँग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक सहज जिंकू, असा भ्रम होता. मात्र, भाजपच्या आव्हानाची खरी जाणीव राष्ट्रवादीला होती. यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत मतभेद मिटविण्यावर भर देत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यातील मतभेद मिटविले.

काँग्रेसअंतर्गत असलेली गटबाजी उघड सुरू होती. अगदी उमेदवारी अंतिम करीत असताना वसंतदादा कारखान्यावरून जादा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा एक गट, विशाल-प्रतीक पाटील यांचा गट, तर विश्वजित कदम-पृथ्वीराज पाटील यांचा एक गट असे काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट आहेत. या गटाकडून आपल्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह झाला. यातच राष्ट्रवादीला जागा देण्यात आल्याने जागाही कमी झाल्या. याचा फटका राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला परिणामी आघाडीला बसला.

मावळत्या महापालिकेत राष्ट्रवादीचे २५ तर काँग्रेसचे ४५ नगरसेवक होते. राष्ट्रवादीचे संख्याबळ घटून ते १५ झाले तर काँग्रेसला २० जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेसमधून सुरेश आवटी, विवेक कांबळे ही मंडळी भाजपमध्ये डेरेदाखल झाली. जागावाटपात या जागा कोणाच्या, यावर अखेरपर्यत वाद सुरू राहिला. मिरजेतील प्रभाग ५ आणि सांगलीवाडीतील प्रभाग १३ मध्ये दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी होऊ शकली नाही. या ठिकाणी पाच जागांसाठी मत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव मान्य करून कसे तरी अडलेले आघाडीचे घोडे मार्गस्थ करण्यात आले. मात्र, आपसात लढल्याने मिरजेतील जागा भाजपला मिळाल्या नसल्या तरी सांगलीवाडीतील तीन जागा भाजपला मिळाल्या.

महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी  ३५.१४ टक्के म्हणजे ३ लाख ६३ हजार ०९३ मते भाजपला मिळाली. तर काँग्रेसला दोन लाख, १३ हजार ८७७ आणि राष्ट्रवादीला एक लाख, ६१ हजार मते मिळाली. एकूण मतदानापैकी  २०.७० टक्के  मते काँग्रेसला तर १५.६० टक्के मते राष्ट्रवादीच्या पारडय़ात पडली. तर उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोरांना तब्बल एक लाख, ६८ हजार ४६१ मते म्हणजे तब्बल १६.३० टक्के मते मिळाली. टक्केवारीमध्ये राष्ट्रवादीपेक्षा अपक्षांना जादा मतदान झाले आहे. याचा फटका आघाडीच्या उमेदवारांना झाला. तसेच गेल्या २० वर्षांंचा कारभार पाहिला असता नाराज असलेल्या मतदारांनी मोठय़ा प्रमाणात ‘नोटा’चा वापर केला. ‘नोटा’ला झालेले मतदानही लक्षणीय असून, हा पर्याय तब्बल २५ हजार ४४३ मतदारांनी स्वीकारला.

राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसमध्ये तिकीटवाटपात प्रचंड नाराजी होती. याला कारण पक्षात एकमुखी नेतृत्वाचा अभाव असेच म्हणावे लागेल. कारण मदन पाटील आणि पतंगराव कदम यांच्या पश्चात होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने नाराजांची नाराजी दूर करण्यात ताकदीने प्रयत्न करणारे नेतृत्वच नव्हते. या तुलनेत राष्ट्रवादीमध्ये आमदार जयंत पाटील सांगतील ती पूर्व दिशा अशी स्थिती असतानाही जागा कमी का मिळाल्या तर याला उत्तर काँग्रेसच्या नाराजीचा फटका तर आहेच, पण त्याचबरोबर राष्ट्रवादीबाबत गेल्या २० वर्षांत निर्माण झालेले अविश्वासाचे वातावरण. कारण लोकसभेला एक, विधानसभेला दुसरीच आणि महापालिकेसाठी तिसरीच भूमिका घेतली जात असल्याने याची जबर किंमत मोजावी लागली हेही मान्य करायला हवे.

जयंत पाटील यांनी गेली दोन महिने महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करीत मदानात तळ ठोकला होता. प्रभागनिहाय बठका, प्रचार फेरी, कोपरा सभा यामधून राज्य आणि केंद्र शासनावर टीका केली. भाजपच्या रणनीतीवर भाष्य करीत असताना आपण काय करणार आहोत, हे सांगत असताना तीच तीच आश्वासने मतदारांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी नाहीत, पिण्यासाठी शुध्द पाण्याचे आश्वासन, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, बाग, रस्ते हे नागरी प्रश्न पुन्हा मांडले गेले. मात्र, सत्ता देऊनही या प्रश्नांची तड लावली जात नसल्याने मतदारांचा या आश्वासनावर विश्वास बसला नाही.

काँग्रेसशी आघाडी करणे ही राष्ट्रवादीची केवळ गरजच नव्हे तर अगतिकता होती की काय असा प्रश्न प्रारंभीच्या काळात पडला होता. कारण काँग्रेसचे विशाल पाटील हे इस्लामपूरचे पार्सल पुन्हा सांगलीकरांच्या मानगुटीवर नको म्हणत असताना प्रत्युत्तर देण्याचे टाळत प्रदेश पातळीवरून आघाडीचा निर्णय काँग्रेसच्या गळी उतरविण्यात आला. मात्र, त्याचवेळी आमदार पाटील स्वबळावर लढण्याची वेळ आलीच तर तशी तयारी असल्याचेही दुसऱ्या फळीच्या माध्यमातून सांगत होते. यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, आघाडीचा निर्णय अंतिम क्षणी होऊन नाराज मंडळींची संख्या वाढली. या नाराजीतूनच बंडखोरीचा उदय झाला. आघाडीची उमेदवारी मात्र जाहीर करण्यास विलंब केल्याने भाजपने अखेपर्यंत दार उघडे ठेवूनही मातब्बर भाजपच्या हाती लागले नाहीत, याचे रूपांतर बंडखोरीत झाले. जर अपक्ष आणि पराभूत उमेदवार यांच्या मतांची बेरीज केली तर भाजपला सात ते आठ जागा गमवाव्या लागल्या असत्या. याचबरोबर मिरजेतील मत्रीपूर्ण लढतीचा परिणाम प्रभाग सात आणि तीनवर झाला. प्रभाग तीनमध्ये तर आघाडीने उमेदवारच दिले नाहीत. अपक्षांना पुरस्कृत करीत असताना त्यांना मदत करणारे प्रभाग ५ मध्येच अडकल्याने त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला.

राष्ट्रवादीपेक्षा बंडखोरांना अधिक मते

पालिका निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी  ३५.१४ टक्के म्हणजे ३ लाख ६३ हजार ०९३ मते भाजपला मिळाली.  काँग्रेसला दोन लाख, १३ हजार ८७७ आणि राष्ट्रवादीला एक लाख, ६१ हजार मते मिळाली. एकूण मतदानापैकी  २०.७० टक्के  मते काँग्रेसला तर १५.६० टक्के मते राष्ट्रवादीच्या पारडय़ात पडली. टक्केवारीमध्ये राष्ट्रवादीपेक्षा अपक्षांना जास्त मतदान झाले आहे. नाराज झालेल्या बंडखोरांना तब्बल एक लाख, ६८ हजार ४६१ मते म्हणजे तब्बल १६.३० टक्के मते मिळाली.  ‘नोटा’ला झालेले मतदानही लक्षणीय असून, हा पर्याय तब्बल २५ हजार ४४३ मतदारांनी स्वीकारला.