वसई-विरार शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरातबाजी करून शहराचे विद्रूपीकरण करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी भिंतींवर पक्षाचे निवडणूक चिन्ह रंगवून शहराच्या विद्रूपीकरणात भर घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत पालिका आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.

वसई-विरार शहरात सध्या बेकायदा जाहिरातबाजीचे पेव फुटले आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणे, उड्डाणपूल, पथदिव्यांचे खांब, भिंती अशा अनेक ठिकाणी जाहिरातबाजी केली जात आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षाचे फलक, बोधचिन्ह रंगवणे, वाढदिवसाचे छायाचित्र, सभा मंडपासाठी अनधिकृत खोदकाम अशा गोष्टी शहरात सरार्स होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन शहर बकाल दिसू लागले आहे. अशा प्रकारच्या बेकायदा जाहिरात फलकांमुळे रस्त्यावरील मोकळ्या जागाही व्यापल्या जात आहेत. त्यामुळे लावण्यात आलेले सूचना फलकही झाकोळले जात आहेत. अशा प्रकरच्या फलकबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली होती.

सध्या शहरातील नालासोपारा पूर्व, आचोळे रोड, गालानगर, शिर्डीनगर, नालासोपारा रेल्वे स्थानक व परिसर, चंदननाका, अलकापुरी, वसंतनगरी (अग्रवाल) अग्निशमन विभाग परिसर, एव्हरशाईन सिटी अशा अनेक ठिकाणी भाजपकडून जाहिरातबाजी केली आहे. सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर बेकायदा निवडणूक चिन्ह लावून शहर  अस्वच्छ, विद्रूप करण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नालासोपारा विधानसभा अध्यक्ष सचिन कदम यांनी केला. याविरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ च्या कायद्यानुसार (एमपीडीपी) आणि शासकीय जागेवर अतिक्रमणसंदर्भात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे भाजप पदाधिकाऱ्यांवर दाखल करण्याची मागणी पालिका आयुक्त व पालघर पोलीस अधीक्षक यांच्याकडे केल्याचे सचिन कदम यांनी सांगितले.

शहरातील खराब झालेल्या भिंती स्वच्छ करून त्याठिकाणी कमळ रंगवण्याचा कार्यक्रम देशभरात सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार वसई-विरार शहरातील भिंतींवर ही कमळाचे चित्र काढण्यात येत आहे. त्या त्या ठिकाणच्या जागेची परवानगी घेऊन ही चित्रे काढण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी कमळचिन्ह काढलेल्या ठिकाणी कोणाची हरकत असल्यास ती भिंत पुन्हा आहे तशी करून देऊ. भिंतीवर कमळाचे चित्र काढणे हा गुन्हा नाही.

– सुभाष साटम, जिल्हाध्यक्ष, भाजप