भाजपच्या दोन-चार पुढाऱ्यांनी मिळून युती तोडली. त्यांना बाहेरून ६० उमेदवार घ्यावे लागले. त्या वेळी भाजपने हे पाहिले नाही की, हा विरोधी पक्षाचा आमदार आहे. फक्त उमेदवार नाही म्हणून भाजपने विरोधकांनाही जवळ केले, असा टोला युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सावदा शहरात शनिवारी आदित्य ठाकरे यांचा ‘रोड शो’ झाला. त्यानंतर झालेल्या सभेत स्वत:च्या स्वार्थासाठी ज्यांनी युती तोडली, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्या भाजपला त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. काँग्रेस व राष्ट्रवादीने जनतेची पिळवणूक व लूट केली. राज्यात नवीन उद्योगधंदे आले नाहीत. शिक्षणाची योग्य व्यवस्था नाही, शेतकरी व कर्मचारी भरडले गेले. हे सर्व बदलण्यासाठी शिवसेनेला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवा आहे की दिल्लीचा सरचिटणीस हे ठरवावे. तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. राज्यातील प्रश्न दिल्लीतून आलेल्यांसमोर मांडून काही उपयोग होणार नाही. ही परदेशी मंडळी सकाळच्या गाडीने निघून जातात आणि सर्व काही विसरतील, असा इशाराही त्यांनी दिला.