News Flash

भाजपाला ‘आयारामां’ची प्रतीक्षा

जिल्हा परिषद निवडणूक

जिल्हा परिषद निवडणूक

जिल्हा परिषद-पंचायत समित्यांची निवडणूक  सुमारे २५ वर्षांनंतर प्रथमच स्वबळावर लढवत असलेल्या भाजपला प्रभावी कामगिरीसाठी जिल्ह्यात केवळ पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर विसंबून भागणार नसल्याने अन्य पक्ष, विशेषत:, शिवसेनेतील नाराज ‘आयारामां’ची प्रतीक्षा आहे.त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी आत्तापर्यंत फक्त २१ जागांसठी उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्यापैकीही सुमारे ३० टक्के आयात केलेले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे २१ आणि पंचायत समित्यांच्या ४५ उमेदवारांचा समावेश आहे. सेनेचे माजी जिल्हाप्रमुख शशीकांत चव्हाण यांच्या पत्नी स्वाती चव्हाण, स्नेहा जाधव, राष्ट्रवादीतून आलेल्या अनिता बामणे, बहुजन विकास आघाडीतून आलेल्या दीपिका जोशी इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक यांचे घरचे मैदान मानले जाणाऱ्या कसबा गटातून उमेदवारी न मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे नाराज माजी उपाध्यक्ष राजेश मुकादम यांनीही पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात बोलताना, भाजपमध्ये त्यांचे स्वागतच होईल, अशी प्रतिक्रिया माने यांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे अन्य पक्षांमधून येणाऱ्या नाराजांच्या आधारेच भाजप ‘स्वबळा’चा आकडा गाठेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आज सुरुवात झाली. पण भाजप, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चार प्रमुख पक्षांपैकी एकाही पक्षाच्या उमेदवारांची यादी अजून पूर्ण झालेली नाही. सेना व राष्ट्रवादी या दोन प्रमुख प्रतिस्पध्र्यानी त्यात आघाडी घेतली असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर काँग्रेस पक्षाने ११ उमेदवार निश्चित केले आहेत. तसेच ही निवडणूक भाजप व सेना स्वतंत्रपणे लढवत असून काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:25 am

Web Title: bjp in district council election
Next Stories
1 औकात, सडलो ही भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- अजित पवार
2 नोटाबंदीचा आदिवासींना फटका
3 विदर्भातील साखर कारखानदारीला घरघर
Just Now!
X