|| प्रशांत देशमुख

वर्धा लोकसभा मतदारसंघात निवडून येणारा खासदार लागोपाठ दुसऱ्यांदा निवडून येत नाही, अशी परंपरा गेले दोन दशके पडली असून, यंदा ही परंपरा कायम राहते का, याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. भाजपसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा असून, कोणत्याही परिस्थितीत पुन्हा विजय मिळविण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. विरोधकांच्या आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहतो की मित्र पक्षाकडे जातो याचाही चर्चा सुरू झाली आहे.

वर्धा जिल्हय़ातील चार तर अमरावती जिल्हय़ातील दोन विधानसभा मतदारसंघांचा वर्धा मतदारसंघात समावेश होतो. सहापैकी प्रत्येकी तीन आमदार भाजप आणि काँग्रेसचे आहेत. कधी काळी काँग्रेसचा गड अशी ओळख असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार पुन्हा निवडून आलेला नाही.  १९९६ विजय मुडे (भाजप), १९९८ दत्ता मेघे (काँग्रेस), १९९९ प्रभाराव (काँग्रेस), २००४ सुरेश वाघमारे (भाजप), २००९ दत्ता मेघे (काँग्रेस) यांना सलग विजय मिळविता आलेला नाही. विद्यमान भाजपचे खासदार रामदास तडस यांचे राजकीय भवितव्य काय, अशी चर्चा यातूनच रंगली आहे.

प्रत्येक निवडणुकीत कुणबी-तेलीवादाचे सावट राहणाऱ्या या मतदारसंघात गतवेळी प्रथमच लाटेचा करिश्मा दिसून आला. केवळ देवळी हे कार्यक्षेत्र राहिलेल्या व मेघे कुटुंबातील तगडा उमेदवार असूनही तडस यांनी मोदीलाटेत विक्रमी मते मिळाली होती. या वेळी मात्र खासदार तडस यांना स्वबळावर टक्कर देण्याचे आव्हान आहे. त्यासाठी ते आपल्या कामांचा आधार पुरेसा मानतात. खासदार निधी खर्च करण्यात सर्वाधिक आघाडीवर राहणाऱ्या तडस यांचा जनसंपर्क व सहज उपलब्धता या जमेच्या बाजू मानल्या जातात. सर्वाधिक खेडी पिंजून काढल्याचा दावाही ते करतात.

आपल्या कार्यवृत्त अहवालातून खासदार तडस यांनी त्यांच्या क्षेत्रात चारशे किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरविल्याचा दावा केला आहे. पारपत्र सेवाकेंद्र, दिव्यागांना मोफत साहित्यवाटप, बजाज रेल्वे उड्डाणपूल, मोफत वायफाय, वर्धा रेल्वेस्थानकास जागतिक प्रवासी केंद्र म्हणून मान्यता, सहा प्रवासी रेल्वेगाडय़ांना विविध ठिकाणी थांबा, सिंदीला ड्रायपोर्ट प्रकल्प, सिंदीविहिरी येथे मेगा फूडपार्क व अन्य उपक्रमांना मंजुरी मिळवून आणली. तसेच नव्या उड्डाणपुलांना मंजुरी, रेल्वे आरक्षण केंद्र, उज्ज्वला योजनेत सर्वाधिक लाभार्थी, आवास योजना अशा कार्यक्रमांना गत चार वर्षांत गती दिल्याचा दावा खासदार तडस यांनी केला आहे.

पक्ष संघटनपातळीवर नव्या कार्यकर्त्यांचा समावेश, तालुका मेळावे, कार्यविस्तार योजना राबविल्याने आपणास पक्षाचे तिकीट हमखास मिळणार असल्याची त्यांची भावना आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सागर मेघे यांचेही नाव चर्चेत आल्याने भाजपत काहीसा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. जातीय ध्रुवीकरणात तेली समाजास एक तिकीट देण्याची भाजपश्रेष्ठींनी भूमिका असते. तडस यांना परत संधी मिळण्याचे ते एक प्रमुख कारण दिले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर झालेला प्रत्येक निवडणुकीत भाजपची घोडदौड कायम राहली. सहाही नगर परिषदांसह जिल्हा परिषदेवर पूर्ण बहुमताने भाजपची सत्ता आहे. विविध सत्तास्थाने भाजपकडे आली. पण त्यासोबतच गटबाजीही वाढली. खासदार तडस यांचेही हितशत्रू तयार झाले.

काँग्रेसतर्फे  महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांचे नाव आघाडीवर आहे. माजी प्रदेशाध्यक्षा व माजी खासदार प्रभाव यांच्या चारुलता या कन्या आहेत. त्यांचे मावसबंधू रणजित कांबळे हे देवळीचे आमदार आहेत. काँग्रेसला गटातटाच्या राजकारणाचा नेहमीच फटका बसतो. काँग्रेसने राज्यात आघाडी स्थापन करण्यावर भर दिला आहे. राजू शेट्टी यांना हातकणंगले मतदारसंघातून पाठिंबा देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी आहे. एकापेक्षा अधिक जागांची शेट्टी यांची मागणी आहे. वर्धा मतदारसंघातून शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते हे सुद्धा इच्छुक आहेत. अलीकडेच मोहिते यांचे जिल्हय़ातील दौरे वाढले आहेत.

‘‘केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांमुळे भाजपलाच मतदार परत संधी देणार आहे. समाजातील प्रत्येक घटकांची कामे झाली आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक या बाबींना याच काळात सर्वाधिक चालना मिळाली. गत चार वर्षांत मी स्वत: एक हजारांवर कार्यक्रमांना हजेरी लावली. लोकसभेत विविध समस्यांवर लक्ष वेधले. केंद्राचा व राज्याचा निधी खेचून आणला. मागील चार वर्षांत झालेली कामे मतदार पाहतात. मला स्पर्धकच नाही, अशी माझी खात्री आहे.’’    – खा. रामदास तडस

‘‘पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांप्रमाणेच पक्षाचे खासदारही खोटारडे आहेत. काँग्रेसच्याच काळात झालेल्या कामांना ते आपल्या नावावर खपवितात. घोषित कामे कागदोपत्रीच आहे. पाण्याचा प्रश्न कायम असून जिल्हय़ास दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. सिंचन प्रकल्प पुढे सरकले नाही. केंद्राकडून निधी आणण्यात खासदार कमी पडल्याची माझी पाहणी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. पण खासदार चकार शब्द बोलले नाही. केवळ घोषणाच घोषणा ऐकल्या.’’   – चारुलता टोकस, प्रदेशाध्यक्ष, महिला काँग्रेस.