जिल्ह्यतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुंडलवाडी वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील निष्ठावंतांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्षांवर टीकेचे शब्दबाण सोडले आहेत.

जिल्ह्यातील नऊ नगर परिषदा आणि दोन नगर पंचायतीत काही ठिकाणी शिवसेनेशी युती करत भाजपने नगराध्यक्षपदाच्या सर्व आणि नगरसेवकपदाच्या १९७ पकी सुमारे १५० जागा लढविल्या. पक्षाचे नगराध्यक्षपदाचे ८ उमेदवार पराभूत झाले आणि नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पक्षाला जेमतेम २८ जागा मिळाल्यामुळे रविवारी मतदान झाल्यानंतर पक्षनेत्यांमध्ये जो उत्साह, जो आत्मविश्वास होता, तो सोमवारच्या निकालानंतर पूर्णत: मावळला. पक्षाच्या वर्तुळात अक्षरश: अवकळा पसरली. निकालावर कोणतीही प्रतिक्रिया न देता जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर तडक मुंबईला गेले तर प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर यांनी कुंडलवाडीच्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना बिलोली व देगलूरमधील पक्षाचे अपयश झाकण्याची कसरत केली.

दुसऱ्या बाजूला पक्षातील निष्ठावंतांपकी माजी संघटनमंत्री सुधाकर भोयर यांनी पक्षाच्या अपयशाचा ठपका जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यावर ठेवला असून पक्षनेतृत्वाने निष्क्रिय जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी करावी, अशी मागणी सोमवारी केली. जिल्ह्यातील निवडणुकांच्या निकालानंतर भोयर यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्राची प्रत प्रसारमाध्यमांकडेही पाठविली. त्यांनी त्यात भाजप जिल्हाध्यक्ष रातोळीकर हे काँग्रेसला पोषक ठरेल अशा पद्धतीने काम करत असल्याचा आरोप केला. नायगाव येथील भाजप कार्यकत्रे सुरेश लंगडापुरे यांनी समाज माध्यमाद्वारे पक्ष पदाधिकारी तसेच अन्य स्थानिक नेत्यांवर कडक शब्दांत तोफ डागली आहे.

धर्माबाद नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या लढतीत भाजपाला यशाची खात्री होती. त्यानुसार पक्षाच्या उमेदवार स्वाती पोतगंटीवार विजयाच्या जवळपास गेल्या; पण शेवटी त्यांचा जेमतेम मतांच्या फरकाने पराभव झाल्यानंतर या पराभवाचे खापर पक्षाच्या एका युवा नेत्यावर फोडण्यात येत आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, निवडणूक निकाल व यशापशाचा अहवाल आपण प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत, असे स्पष्ट केले. आरोप आणि टीका करणाऱ्यांबद्दल त्यांनी मतप्रदर्शन केले नाही; पण वृत्तपत्रांकडे धाव घेऊन आरोप करणे पक्षशिस्तीत बसणारे नाही, असा टोला रातोळीकर यांनी लगावला.