|| दिगंबर शिंदे

काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांनी विजय संपादन केला होता. सहा महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे पडसाद उमटू लागले असून, भाजपमध्ये उमेदवारी कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे  खासदार संजयकाका हेसुद्धा सक्रिय झाले आहेत. काँग्रेसमध्ये उमेदवाराची वानवा असल्याने त्याचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी  भाजपाने राष्ट्रवादीतून आयात केलेल्या अजितराव घोरपडे आणि संजयकाका पाटील यांच्या नावासाठी चर्चा केली. घोरपडे यांचा एक पाय राष्ट्रवादीत आणि दुसरा पाय भाजपमध्ये होता. त्यांनी कमळ चिन्ह न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती.  तत्पुर्वी २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत घोरपडे यांच्यासाठी भाजपने दीपक शिंदे यांना देण्यात आलेला पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचा फॉर्म अखेरच्या क्षणी मागे घेऊन घोरपडेंना पुढे चाल दिली होती. तीच खेळी २०१४ साठी घोरपडे यांची होती. मात्र भाजपने कमळाविना उमेदवारी नाही अशी अट घातली आणि आपसूकच दुसऱ्या पसंतीवर असलेल्या संजयकाकांना संधी मिळाली. मोदी लाटेत भाजपला यश मिळाले.

या परिवर्तनाच्या लाटेत व्यासपीठावर येऊन मदत करणारे, पडद्यामागे राहून मदत करणारे हे सगळे सत्तेचे भागीदार बनले. यामध्ये जतचे विलासराव जगताप, कडेगावचे पृथ्वीराज देशमुख, आटपाडीच्या देशमुखांच्या वाडय़ातील राजेंद्रअण्णा देशमुख ही मंडळी आहेतच, पण त्याचबरोबर सुधीर गाडगीळ यांना आमदारकीची संधी मिळाली आणि मिरजेचे सुरेश खाडे यांनी हॅट्ट्रिक केली.

या चर्चा सुरू असतानाच भाजपने लोकसभेसाठी पेरणी सुरू केली आहे. गावपातळीवर या पेरणीची दखल घेतली जात असून या गणतीत विरोधक कोण, हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित असल्याने या चच्रेत काँग्रेसचा उमेदवार कोण, या प्रश्नाला उत्तर नाही. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील गेल्या वेळच्या पराभवापासून फारसे सावरल्याचे दिसत नाहीत. काँग्रेसचा असलेला सांगलीचा बालेकिल्ला भाजपला राष्ट्रवादीच्या राजकीय खेळीने कायमचाच दत्तक  दिला आहे की काय, असा साहजिकच प्रश्न काँग्रेसप्रेमींच्या मनात येत आहे.

स्थानिक पातळीवर सरशी

लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने महापालिकेचा निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू केली. जिल्हयातील चार विधानसभा मतदारसंघांसह जिल्हा परिषद, इस्लामपूर, तासगाव नगरपालिका, काही पंचायत समित्या, काही ग्रामपंचायतींची सत्ता मिळाल्यानंतर यशाच्या या चढत्या कमानीवर महापालिकेची निवडणूक जिंकून भाजपने अख्ख्या जिल्हाभर पाय पसरल्याचे दाखवून दिले.

या तुलनेत प्रबळ विरोधकांची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी असलेली काँग्रेस सोबतीला राष्ट्रवादी कधी येतो, मग आमची ताकद वाढणार, असा काँग्रेसचा होरा आहे. मात्र आपल्या घराची बिळे मुजविण्याऐवजी राष्ट्रवादीच्या सारख्या पाहुण्याच्या लाठीने साप मारण्याची तयारी सध्या तरी काँग्रेसची दिसत आहे. या तुलनेत एकेकाळी जिल्ह्य़ावर एकहाती वर्चस्व असलेली हीच का काँग्रेस अशी म्हणण्याची वेळ आता दूर राहिली आहे, असे सध्याच्या स्थितीवरून वाटत आहे.

लोकसभेसाठी प्रतीक पाटील यांच्या नावाचा विचार काँग्रेसकडून प्राधान्याने केला जात नाही यामागे ही कारणे आहेतच याचबरोबर त्यांचीही मानसिकता निवडणुकीसाठी दिसत नाही. विशाल पाटील यांचे दिल्लीपेक्षा मुंबईकडे जास्त नजर आहे. यामुळे ते या मदानात येण्यास राजी नाहीत, तर पतंगराव कदम यांचे पुत्र आ. विश्वजित कदमही सध्या दिल्लीपेक्षा मुंबईतच स्वारस्य दाखवित आहेत. यामुळे खासदार पदासाठी उमेदवार कोण, हा प्रश्न अगोदर काँग्रेसला सोडवावा लागणार आहे.

उमेदवारीचा प्रश्न सोडवित असताना हा उमेदवार मित्रांना म्हणजे राष्ट्रवादीला पर्यायाने आमदार जयंत पाटील यांना रुचणारा हवा हीसुद्धा एक लिखित अट काँग्रेसला पाळावी लागणार आहे. कारण जर मित्रांचे नेते नाराज असतील तर सगळेच मुसळ केरात जाण्याचा धोकाही आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधकांना समोरच्या मदतीचा हात याच शक्तींनी दिला आहे.

भाजपने लोकसभेसाठी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. संजय पाटील यांचे जनतेसमोर राहण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जानेवारीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणासाठी आमंत्रित करण्यात काकांनी पुढाकार घेतला  आहे.

आटपाडीचे गोपीचंद पडळकर यांना अंगावर घेण्याची तयारी काकांनी आतापासूनच सुरू केली असून मतांची होणारी वजाबाकी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून करण्याची तयारी चालविली असून यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी कामी आली आहे.