04 December 2020

News Flash

सोलापुरात उमेदवारी अर्जाच्या छाननीत भाजपाला झटका

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी १०२ जागांकरिता एकूण १०५० उमेदवारी अर्ज दाखल झाले

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी १०२ जागांकरिता एकूण १०५० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून या अर्जाची छाननीची प्रक्रिया शनिवारी सकाळी सुरू झाली. विविध प्रमुख पक्षांच्या मातब्बर उमेदवांरांच्या विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी विविध हरकती उपस्थित करीत उमेदवारी अर्जाना आक्षेप घेतले होते. यात प्रभाग क्र. १६ मधील भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका विजया वड्ड्ेपल्ली व वृषाली चालुक्य आदींच्या अडचणी वाढल्या. यात चालुक्य यांचा अर्ज बाद ठरला. सायंकाळी उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर इतर उमेदवारांच्या अर्जावरील हरकतींवर सुनावणी प्रक्रिया सुरू होती.

प्रभाग क्र. १६ ‘क’ मधून भाजपाने वृषाली चालुक्य या नवख्या तरुण कार्यकर्तीला बोलावून उमेदवारी प्रदान केली असता त्यांच्या उमेदवारी अर्जाला प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत हरकत घेतली होती. त्यावर सायंकाळी उशिरा सुनावणीअंती चालुक्य यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे सत्तेसाठी आतूर झालेल्य भाजपाला धक्का बसला. उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या तांत्रिक दोषामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका विजया वड्डेपल्ली यांच्या अर्जाला प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराने हरकत नोंदविली आहे. वड्डेपल्ली यांनी प्रभाग क्रमांक १३ ‘ब’ आणि ‘क’ मधून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्जात एकच सूचक व अनुमोदक होते. मात्र ज्या अर्जासोबत पक्षाचा बी फॉर्म जोडला होता, त्यामध्ये त्यांनी सूचकाचे नाव पेनने परस्पर खोडून टाकले व दुसरे नाव लिहिले. त्यामुळे त्यांच्या अर्जाला काँग्रेसच्या उमेदवार होमकर यांनी जोरदार हरकत घेतली. त्यावर सुनावणी होऊन वड्डेपल्ली यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरविला. त्यामुळे विजया वड्डेपल्ली ह्य़ा भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू शकणार नाहीत. याच एका प्रभागात भाजपाने एकाच जागेसाठी दोन महिला उमेदवारांना पक्षाचे ए बी फॉर्म दिले होते. यात अर्जाच्या छाननीच्या वेळी पहिल्यांदा सुनावणी झालेल्या महिलेला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तर दुसऱ्या महिलेची अडचण झाली.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे व त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मनोहर सपाटे यांनी घेतलेली हरकत फेटाळली गेली. कोठे यांच्या वतीनेही सपाटे यांच्या विरोधात हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 1:01 am

Web Title: bjp in solapur municipal corporation elections
Next Stories
1 भाजप, शिवसेनेत धुसफुस; भाजप शहराध्यक्षांना धक्काबुक्की
2 सोन्याचा मुलामा दिलेल्या ताटातील भोजनाच्या वृत्ताचे खंडन
3 ‘ज्योतीच्या विनंतीवर आक्षेप घेण्याचा पोळला अधिकार नाही’
Just Now!
X