लवकरच अनेकांचा पक्षप्रवेश

मुंबई : आपापल्या मतदारसंघात पक्षाच्या ताकदीपलिकडे स्वत:ची शक्ती असणाऱ्या विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांना पक्षात आणून भाजप मजबूत करण्याच्या धोरणानुसार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार तसेच प्रभावशाली नेत्यांवर भाजपने गळ टाकला आहे तर अनेक आमदार स्वत:हून भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेपूर्वी आणि यात्रेच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ दिसणार आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक आमदार-नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे विधान नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण

विखे-पाटील यांनी केले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्याबाबत सूतोवाच केले होते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अकोले मतदारसंघातील आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे पुत्र वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे यांची पिचड यांना भाजपकडे वळवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे समजते. मुंबईतील कॉंग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी तर उघडपणे भाजपचा प्रचार केला होता.

कॉंग्रेसचे नेते इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील  यांनी मुलीसह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने तेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, खुद्द हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे वृत्त फेटाळले. ३० जुलैला होणाऱ्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपमध्ये जाण्याचा त्या भेटीशी काहीही संबंध नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. भाजपचे आमदार शिवार्जी कर्डिले यांचे जावई आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. त्याबाबत विचारले असता, ती भेट भाजपमध्ये जाण्याबाबत नव्हती तर एका सार्वजनिक कामाबाबत होती. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेही त्यावेळी उपस्थित होते, असे जगताप यांनी सांगितले.

याबरोबरच पंढरपूरचे आमदार भारत भालके, अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे, माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.