तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपचे स्थानिक नेते धर्मसंकटात सापडले आहेत. सहानुभूतीच्या लाटेवर राष्ट्रवादीला यश मिळणे सुलभ वाटत असताना कवठे महांकाळचे अजितराव घोरपडे यांची मदानात उतरण्याची तयारी असताना भाजपतच उमेदवार द्यावा की बाय द्यावा यातून धर्मसंकट निर्माण झाले आहे.
    आर. आर. आबांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी अपेक्षेपेक्षा कमी वेळेत निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. मंगळवारपासून निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे आबांच्या कुटुंबातच उमेदवारी देऊन भाजपच्या स्थानिक नेत्यांची कोंडी केली आहे. आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी देताना मतदारसंघात सहानुभूतीची असणारी लाट पक्षाकडे वळवण्यात नेते यशस्वी झाले.
    मतदारसंघात अन्य राजकीय पक्षांची दखल घ्यावी इतके ते पक्ष मतदारसंघात विस्तारलेले नाहीत. काँग्रेसने राष्ट्रवादीची विनंती येण्यापूर्वीच आपण उमेदवारी देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगून ही पोटनिवडणूक एकतर्फी कशी होईल याकडे पाहिले. मनसे, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मतदारसंघात असणारी ताकद मर्यादित असल्याने त्यांचा विचारच होउ शकत नाही. त्यामुळे पक्षीय पातळीवर दिसणारी या ठिकाणची निवडणूक जिल्हाअंतर्गत असलेल्या दादा-बापू या गटातूनच होत होती.
    आबांच्या विरुद्ध निवडणूक लढविणारे अजितराव घोरपडे या वेळच्या पोटनिवडणुकीत पुन्हा मदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. या वेळी जर मदानातून बाहेर राहणे पसंत केले तर गावपातळीवर असणारा गट शाबूत ठेवणे कठीण ठरणार असल्याने गट जिवंत ठेवण्यासाठी विरोधाची भूमिका घ्यावी लागत आहे.
    मात्र भाजपत निवडणूक लढवण्यासाठी मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी द्यायचीच नाही असे ठरवले तर गट शाबूत ठेवण्यासाठी अपक्षाचा प्रयोग पुन्हा एकदा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कवठे महांकाळ आणि तासगावमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या बठकीत तसा आग्रह झाला असून त्यादृष्टीने अंतर्गत तयारी सुरू आहे. तसेच या पोटनिवडणुकीला जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सांगली बाजार समितीची तोंडावर येऊ घातलेल्या निवडणुकीची पाश्र्वभूमीही आहे. जिल्हा नेत्यांच्या दृष्टीने बँक आणि बाजार समितीची गणिते घालूनच ही निवडणूक रंगणार की एकतर्फी होणार हे ठरवण्यात येईल.