मनपा पदाधिकारी निवडणूक
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीबाबत सध्या तरी ‘थांबा आणि पहा’ अशी सावध भूमिका स्वीकारत काँग्रेसने यासाठी पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोपवण्याचे ठरवले आहे. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत ही भूमिका ठरवली गेल्याचे समजले. भाजपने दोन दिवसांपूर्वी महापौरपदासाठी काँग्रेस आघाडीशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिल्याच्या घटनेबद्दलही विखे यांच्या बैठकीत चाचपणी करण्यात आली. दरम्यान भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी उद्या, सोमवारी नगरमध्ये येत आहेत, त्यानंतर वेगवान घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सध्या पक्षांत जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र त्या तुलनेत, विविध कारणांनी पक्षांतर्गत अवस्था बिकट झालेली काँग्रेसमध्ये शांतताच होती. या पक्षाचे एकूण ११ नगरसेवक आहेत. मात्र त्यातील दोन जणांनी परिस्थिती लक्षात घेऊन यापूर्वीच शिवसेनेशी संपर्क केला आहे. आणखी एकजण सेनेबरोबर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यापाश्र्वभूमीवर पक्षाच्या नगरसेवकांची मते जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विखे यांनी लोणी येथे नगरसेवकांना पाचारण केले होते. रुपाली वारे, सुभाष लोंढे, सुनील कोतकर, सविता कराळे, सुनीता कोतकर, फैय्याज शेख हे सहा नगरसेवक उपस्थित होते. उपमहापौर सुवर्णा कोतकर व काँग्रेसमधील थोरात गटाचे दिप चव्हाण हे दोघे अनुपस्थित होते. मात्र या दोघांनी दूरध्वनी करुन तुमच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत, असे विखे यांना कळवल्याचे समजले.
विखे यांनी उपस्थित नगरसेवकांची मते जाणून घेतली. नगरसेवकांनी विखे जो निर्णय घेतील तो मान्य करु असे सांगतानाच सध्या महापालिकेची आर्थीक स्थिती बिकट आहे, कामे होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, अन्य पक्षाशी सहकार्य करताना याही मुद्याचा विचार व्हावा, असेही सुचवण्यात आले. त्याच बरोबर पक्षाच्या भूमिकेशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार विखे यांना देण्यावर एकमत झाले. दोनच दिवसांपुर्वी भाजपने महापौरपद मिळवण्यासाठी काँग्रेस आघाडीशी हातमिळवणी करण्याचे संकेत दिले होते. त्यापाश्र्वभुमिवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी व्यक्त केलेले मत महत्वपूर्ण मानले जाते. दिल्लीत असलेले भाजपचे खा. गांधी उद्या नगरमध्ये परतत आहेत. ते येथे आल्यानंतर यासंदर्भातील घडामोडी आणखी वेग घेतील, असे मानले जाते.