पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करणे, मतदान केंद्राची निश्चिती करणे याची धावपळ सुरू झालेली असताना राजकीय घडामोडींना बुधवारी वेग आला. भाजपचे इच्छुक उमेदवार बुधवारी मुंबई वारीत होते. खासदार रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीतील असंतुष्ट सचिन मुळे यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा केली. सचिन मुळे यांनी चर्चा झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तथापि भाजपची उमेदवारी घेण्याबाबत सकारात्मक नसल्याचे सांगितले.
दरम्यान, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासनाने कार्यवाहीचा वेग वाढविला. आता ३ जूनपर्यंत मतदारांना नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी लागणारा १८ क्रमांकाचा फॉर्म सर्वत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दरम्यान, मतदान केंद्रामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावावर बुधवारी चर्चा करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात ४७ मतदानकेंद्र वाढविण्यात येणार आहेत. पूर्वी ही संख्या १२६ होती. मराठवाडय़ातील इतर जिल्ह्यातूनही मतदान केंद्र वाढीचे प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर होणार आहेत. शहरात २७ मतदान केंद्र वाढविण्यात आले आहेत. आचारसंहिता लागल्याने जाहीर सभा, रॅली व पदयात्रांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी लागणार आहे. तहसील कार्यालयात व्हिडिओ पथके लावली जाणार आहेत. जिल्ह्यात या मतदारसंघ निवडणुकीसाठी एक हजार कर्मचारी मतदानासाठी, तर मतमोजणीसाठी एक हजार कर्मचारी लागतील असा अंदाज बांधून त्यांच्या नियुक्तीची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. मराठवाडाभर मतदारसंघाची व्याप्ती असल्याने उमेदवारांना प्रचारसाठी कमी कालावधी मिळाणार आहे. प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचणेही अवघड असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अद्याप भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. तो दोन – तीन दिवसांत ठरेल असे सांगितले जात आहे. दरम्यान, बीडच्या वार्ताहराने कळविल्यानुसार बीडमध्ये झालेल्या बैठकीत प्रा. सतीश पत्की यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली. अभाविपच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पत्की यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला.