केंद्रापाठोपाठ राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही लाल दिव्याने हुलकावणी दिल्याने जिल्ह्य़ातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची निराशा पसरली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले डॉ. विजयकुमार गावित आणि एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक असलेल्या उदेसिंग पाडवी यांच्यापैकी एकाला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची कार्यकर्त्यांना आशा होती. चार दशकांपासून लाल दिव्यांचा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्य़ाची ओळख आहे. केंद्र असो वा राज्य सातत्याने कॅबिनेट अथवा राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्य़ास नेहमीच मंत्रिपद लाभले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुरूपसिंग नाईक, माणिकराव गावित, पदमाकर वळवी, विजयकुमार गावित, रमेश वळवी, अशा नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्य़ाला नेहमीच लाल दिवा लाभला. १९९६च्या युती शासनाच्या कार्यकाळातही डॉ. विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून मंत्रिपद जिल्ह्य़ाला मिळाले होते. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्य़ात पहिल्यांदाच एक खासदार आणि दोन आमदारांच्या रूपाने भाजपने मागील निवडणुकांमध्ये आपले खाते खोलले. देवेंद्र फडवणीस सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच जिल्ह्य़ाला मंत्रिपदाने हुलकावणी दिली. अनेक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असल्याने डॉ. गावित यांना पहिल्यांदा मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले होते. मात्र या चौकशीतून बाहेर आल्यानंतर डॉ. गावित यांना मंत्रिपद मिळेल असा विश्वास त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारातदेखील त्यांचा विचार न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहावयास मिळत आहे.

अभ्यासू आणि हुशार खासदार म्हणून ओळख असलेल्या डॉ. हीना गावित यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तेथेही संधी हुकली. डॉ. गावित जरी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले असले तरी खडसे यांचे समर्थक असलेले उदेसिंग पाडवी शहादा मतदारसंघातून निवडून आले आहेत. खडसे यांच्यानंतर त्यांच्या समर्थकांना राज्यमंत्री पदाची धुरा दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यातच लगतच्या धुळे जिल्ह्य़ाला केंद्रापाठोपाठ रावल यांच्या माध्यमातून राज्यातदेखील मंत्रिपद मिळाले असतांना जिल्ह्य़ातील तिघांनाही मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नंदुरबार जिल्ह्य़ास पहिल्यांदाच लाल दिव्याविना राहावे लागले आहे.