खासदार धोत्रे व गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांच्यातील वाद विकोपाला

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अकोला भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली. अकोला भाजपमधील खासदार संजय धोत्रे व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील गटाचा वाद विकोपाला गेला आहे. या वादातून नुकताच गटबाजीचा स्फोट झाला. खा. संजय धोत्रे यांनी जाहीरपणे डॉ. रणजीत पाटील यांच्यावर शाब्दिक प्रहार करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्ष व मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याने डॉ. पाटील यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी खा.धोत्रे यांनी केली. अन्यथा १५ ते २० दिवसांत आपली भूमिका जाहीर करू, अशा निर्वाणीचा इशारा खा. धोत्रे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता भाजप नेतृत्वापुढे गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान असून, अकोल्यातील वादावर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी एका गटाला झुकते माप दिल्यास अकोल्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेला अकोला जिल्हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा अभेद गड झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अकोलेकारांनी नेहमीच भाजपच्या पारडय़ात भरभरून मते टाकली. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असल्याने जिल्ह्य़ाच्या आश्वासक विकासाची अपेक्षा जनतेला आहे. मात्र, अकोल्यात सत्ताधारी भाजपमधील खासदार संजय धोत्रे आणि  गृहराज्यमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातील पराकोटीला गेलेली गटबाजी व त्यातून पक्षाची खालावत चाललेली प्रतिमा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहराचा विकास होणे दूरच राहिले, पक्षांतर्गत कमालीची गटबाजीचेच पदोपदी दर्शन घडत आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यात पक्ष विभागला गेला असून, दोन्ही गटांकडून शह-काटशहाचे राजकारण खेळले जाते. त्यातूनच वाढलेल्या संघर्षांतून पक्षाची प्रतिमा डागाळली असून, कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील सामाजिक समीकरण खा. संजय धोत्रे यांच्या दृष्टीने अनुकूल असल्याने त्यांनी सलग तीन निवडणुकीत विजयी पताका फडकवली. त्यामुळे गेल्या १५ ते २० वर्षांपासून अकोला भाजपवर खा. धोत्रे यांचे एकछत्री नेतृत्व कायम आहे. २०११ मध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघात डॉ. रणजीत पाटील यांनी मातब्बर बी. टी. देशमुख यांचा पराभव करून विधान परिषद गाठली. डॉ. पाटील आमदार झाल्यावर त्यांचे आणि धोत्रे यांचे फारसे जुळले नाही. पक्षांतर्गत धुसफूस सुरूच होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खा. धोत्रे राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याच्या वावडय़ाही उठल्या होत्या. मात्र, धोत्रेंनी भाजप संघटन मजबूत करण्यावरच भर दिला. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून दोघांमध्ये संघर्षांची पहिली ठिणगी पडली. डॉ. पाटील बाळापूर किंवा अकोला पूर्व मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी इच्छूक होते. पक्ष नेतृत्वही त्यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी सकारात्मक असताना खा. धोत्रेंनी त्याला तीव्र विरोध केला. निर्वाणीची भाषा व राजकीय वजन वापरून खा. धोत्रेंनी बाळापूरचे तिकीट आपले समर्थक तेजराव थोरात यांना मिळवून दिले, तर अकोला पूर्वमध्ये आ. रणधीर सावरकर यांना निवडून आणले. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत आल्यावर सलग तीन वेळा खासदार असलेल्या धोत्रेंना केंद्रात तर, आमदारकीची पाचवी टर्म असलेल्या गोवर्धन शर्मा यांना राज्यात मंत्री पदाची अपेक्षा होती, मात्र त्याच्या विपरीत घडले. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय डॉ. रणजीत पाटील यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली. सोबतच त्यांना अकोल्याचे पालकमंत्री पदही देण्यात आले. त्यामुळे धोत्रे-पाटील गटातील असंतोषाची दरी आणखीनच रुंदावली. वर्चस्वाच्या लढाईतून दोन्ही गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण चांगलेच वाढले. मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्य़ात पर्यायी नेतृत्व उभे करण्याच्या दृष्टीने डॉ. पाटील यांना बळ पुरवल्या गेले, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. डॉ. रणजीत पाटील मंत्रिपदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्याभोवती वादाचे व आरोपाचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे ते वारंवार अडचणीत आले आहेत. समित्यांच्या नियुक्त्यांवरूनही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली. धोत्रे गटाकडून डॉ. पाटील यांच्यावर अनेक वेळा जाहीर आरोप झाले आहेत. मात्र, डॉ. पाटील यांनी खा. धोत्रेंवर जाहीरपणे आरोप किंवा टीका करण्याचे प्रामुख्याने टाळले. आता डॉ. पाटील यांच्या घुंगशी या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीवरून या दोन गटांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. यानिमित्ताने अंतर्गत वादाला खुलेआमपणे तोंड फुटले. निवडणुकीदरम्यान डॉ. पाटील यांच्या गटातील लोकांनी विरोधी गटातील हिंमतराव देशमुख यांच्यावर हल्ला करून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार संजय धोत्रे यांनी डॉ. रणजित पाटील यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्यावे, अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली.

खा. धोत्रे यावरच न थांबता त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा १५ दिवसांत आपली वेगळी भूमिका जाहीर करावी लागेल, असा अल्टीमेटमही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. आता या वादाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असून त्यांच्या भूमिकेवर अकोल्याचे पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री यशस्वी शिष्टाई करतात की एका गटाला झुकते माप देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. खा. संजय धोत्रे आपल्या समर्थकांसह इतर वाटही शोधू शकतात. या वादाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीसह इतर पक्ष संधीच्या शोधात आहेत. भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, मुख्यमंत्री व पक्ष नेतृत्व ऐवढा मोठा धोका स्वीकारण्याऐवजी यशस्वी मध्यस्थी करण्यालाच प्राधान्य देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

धोत्रेंची पक्ष संघटनेवर मजबूत पकड

खा. संजय धोत्रे यांची पक्ष संघटनेवर मजबूत पकड आहे. तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे, खांद्याला खांदा लावून सदैव सोबत असलेले ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांची साथ, महापालिकेतील ४८ पैकी ४६ नगरसेवकांचे समर्थन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व आदी खा.धोत्रेंच्या नेतृत्वाच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी असंतष्टांना जवळ करून आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्तेची सूत्रे हातात असूनही केवळ डॉ. पाटील यांच्या भोवतीच फिरणारा तो गट आहे.

सत्तेचा दुरुपयोग करून गंभीर प्रकरणे                 

डॉ. रणजीत पाटील यांच्या कुटुंबीयांच्या कृत्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसत आहे. डॉ. रणजीत पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करून अनेक गंभीर प्रकरणे केली असून त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत.

खासदार संजय धोत्रे, अकोला.

अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप

घुंगशी ग्रामपंचायत निवडणूक व निवडणुकीतील वादाशी माझा कुठलाही संबंध नाही. यापूर्वीही अनेकदा माझा संबंध नसलेल्या प्रकरणाशी संबंध जोडून आरोप झालेत. व्यक्तीगत द्वेषातून असे आरोप करणे चुकीचे आहे. केवळ मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.

डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री