कचरा घोटाळ्यावरून महापालिकेच्या आजच्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. कचऱ्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याने हा विषय स्थगित ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्याचे भाजप नगरसेविका पोटतिडकीने सांगत असतानाच भाजपच्याच महापौर व उपमहापौराने स्थगितीचा प्रस्ताव धुडकावून लावला. विशेष म्हणजे, भाजपच्या महापौर व उपमहापौरच्या बचावासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष नगरसेवक पुढे सरसावल्याचे विचित्र चित्र येथे बघायला मिळाले. 

महापालिकेची आमसभा महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, सभापती रामू तिवारी, आयुक्त सुधीर शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता सुरू झाली. सभा सुरू होताच कचरा घोटाळ्याचा विषय भाजप नगरसेविका अंजली घोटेकर व वनश्री गेडाम यांनी चर्चेला आणला. २०१३ च्या फेब्रुवारीत २० ते २२ लाख रुपयेप्रमाणे ७ वर्षांचा १७ कोटी दिले आहे. तसेच ते कंत्राट रद्द न करता नव्याने घरोघरी कचरा संकलन २३ फेब्रुवारी २०१५ च्या निविदाची तडजोड करून स्थायी समितीने आपल्याकडे विषय न घेता परस्पर महापौर व उपमहापौरांचा संगनमताने आमसभेत विषय ठेवून १०० टन प्रती रोज कचरा महिन्याचे ५४ लाख रुपये ५ वर्षांचे ३३ कोटी रुपयांची निविदा मंजूर करून घेतली. या दोन्ही निविदा एकत्र काढल्या, तर २५-३० लाख रुपये वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रद्द कराव्या, ही मागणी लावून धरत मनपाच्या प्रवेशद्वारासमोर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी महापौर व उपमहापौरांविरोधात उपोषण सुरू केले आहे. तेव्हा कचऱ्याचा विषय स्थगित ठेवा किंवा हे कंत्राट रद्द करा, अशी मागणी घोटेकर यांनी केली. मात्र, महापौर व उपमहापौर यांच्यासह भाजप गटनेते व अन्य काही नगरसेवकांनी ती धुडकावून लावली.
अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कचऱ्याचा विषय गांभीर्याने घेतला आहे. कचऱ्यामुळे भाजपा नेत्यांची प्रतिमा शहरात नाहक डागाळली जात आहे तेव्हा जनतेत नेत्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल तर किमान निविदेचे दर तरी कमी करावे, असेही घोटेकर म्हणाल्या. मात्र, त्यांचीही मागणी धुडकावण्यात आली. कचऱ्यावरून भाजपात उघड उघड दोन गट पडले असतानाच काँग्रेसचे गटनेते संतोष लहामगे, राष्ट्रवादीचे संजय वैद्य, मनसे, अपक्ष तथा अन्य काही नगरसेवक कचऱ्याच्या मुद्यावर भाजपा महापौरांचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र येथे बघायला मिळाले. दरम्यान, या विषयावर गंभीर चर्चा झाल्यानंतर सभापती रामू तिवारी व शिवसेना नगरसेवक संदीप आवारी यांनी उपोषणकर्ते नंदू नागरकर यांना तीन दिवसाचा अवधी दिला आहे.
तीन दिवसात नागरकरांनी ३० लाख रुपयात नवीन कंत्राटदार उभा करावा, त्यानंतर जुने कंत्राट रद्द केले जाईल, असा प्रस्ताव दिला. मात्र, नागरकर कोणताही प्रस्ताव ऐकून घेण्यास तयार नव्हते. दरम्यान, यासंदर्भात नागरकर यांना लेखी पत्र देऊन तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. तसेच सभेत कोळसाव्याप्त क्षेत्र व वेकोलिच्या ताब्यातील क्षेत्राचा रहिवासी क्षेत्रात समावेश करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला, तर स्थायी समिती सदस्य म्हणून संतोष लहामगे, संगीता अमृतकर, रामू तिवारी, एस्तेर शिरवार, अनिल रामटेके, राजकुमारा उके, माया उईके व ललिता गराट यांची निवड करण्यात आली. मनपा सफाई विभागाचे स्वाइन फ्लू व डुक्कर भगाओ अभियानाकडे दुर्लक्ष झाल्याचा मुद्दाही सभेत चर्चिला गेला. मात्र, त्यावर या डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. मोजमाप आणि मनपाच्या नवीन इमारतीचे सौदर्यीकरण व बांधकामाची २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात कोणत्याही पैशाची तरतूद नसताना निविदा काढण्यात आली, मालमत्तेचे क्षेत्रफळ मोजमाप व नंबर टाकणे यांचे कंत्राट ५ वर्षांअगोदर याच कंपनीला दिलेले होते. पुन्हा त्याच कंपनीला प्रती घर ६०० प्रमाणे अंदाजे १ लाख घरासाठी ६ कोटींची निविदा काढून १४-१५ च्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना कंत्राट देण्यात आले आहे. या विषयावरही चर्चा करण्यात आली.