चंद्रपूर : जनतेने ज्या अपेक्षेने भारतीय जनता पक्षाला निवडून दिले. त्याला हरताळ फासत हे सरकार जाती, धर्मात तेढ, द्वेष निर्माण करण्याचे काम करीत असून येत्या निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते राजुरा येथील आंदोलनात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रथम राजुरा शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर साईराम मंगल कार्यालयात कार्यकता शिबीर घेण्यात आले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, जनतेने मोठय़ा अपेक्षेने केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता दिली. भाजपने मोठमोठी आश्वासने दिली. मात्र, चार वर्षांत एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. नोटबंदी करून सरकारच्या हाती काही लागले नाही. मात्र, त्यामुळे उद्योग क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागत आहे. अच्छे दिनाचे आश्वासन देऊन सत्तेत आलेले भाजप सरकार आता पुन्हा सत्तेवर येणार नाही.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर म्हणाले की, स्थानिक आमदार अकार्यक्षम असून अनेक समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरले आहेत. यावेळी व्यासपीठावर भंडारा-गोंदियाचे खासदार मुधकर कुकडे, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, विधानसभा माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार आदी उपस्थित होते. मोर्चाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

निमकरांचे शक्तिप्रदर्शन फोल

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हल्लाबोल आंदोलनाला अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी हल्लाबोल मोर्चाद्वारे केलेले शक्तिप्रदर्शन मुंडे यांच्या अनुपस्थितीने फोल ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is doing hate politics says jayant patil
First published on: 06-09-2018 at 02:05 IST