करोनाच्या संकट काळामध्ये भाजपा राजकारण करत आहे. राज्यपालांना सतत भेटून तक्रारी करणे, शासनावर टीका करणे हा त्याचाच भाग आहे. शासनाला मदत करण्याऐवजी मदत कार्यात खो घालण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर येथे केली.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने जिल्ह्यात ६०० ठिकाणी स्वयंचलित निर्जंतुकीकरण यंत्र बसवण्यात येणार आहे. त्याचे वितरण मंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे हे काँग्रेसचे तीन आमदार, महापौर निलोफर आजरेकर, कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी करोना संकटकाळात सतेज पाटील यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव इचलकरंजीचे काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी मांडला.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘मनरेगा’चे समर्थन करणारा लेख लिहिला आहे. या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मंत्री पाटील म्हणाले, सत्तेत येण्यापूर्वी भाजपाकडून या योजनेवर टीका केली जात होती. परंतु सत्तेत आल्यानंतर ‘मनरेगा’ हीच योजना गरिबांना खरा आधार देऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना मनरेगाला पाठिंबा देणे भाग पडले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मदत कार्यावर राजकीय छाप –
काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वयंचलित निर्जंतुकीकरण यंत्र गावोगावी कार्यान्वित केली जाणार आहेत. मात्र या यंत्रावर काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह ठळकपणे छापले आहे. त्यामुळे याला राजकीय किनार असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सतेज पाटील यांनी ‘हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असल्याने पक्ष चिन्ह लावण्यात गैर काही नाही,’ असा खुलासाही केला.