पक्ष कुणाच्याही मालकीचा नसतो, पक्ष ही एक प्रक्रिया आहे हे कुणीही विसरु नका असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. जनसंघापासून भाजपाची सुरुवात झालेली आहे. भाजपामध्ये आधी आडवाणी, वाजपेयी यांचं युग होतं.  नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज यांनी पक्ष घडवला. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे भाजपाचं नेतृत्त्व आहे. त्यांनी सत्ता आणली ही निश्चितच कौतुकाची बाब आहे मात्र उद्या तेही बदलतील. भाजपा हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे तो मी सोडेनच का? असंही पंकजा मुंडे यांनी विचारलं आहे.

या कार्यक्रमात मला वाघीण असं म्हटलं गेलं, एक लक्षात ठेवा वाघीण कधीही आपलं जंगल सोडत नाही. कोणत्याही पराभवाने मी खचणार नाही हे लक्षात ठेवा. पंकजा मुंडे बोलत होत्या तेव्हा “कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली” अशा घोषणाही देण्यात आल्या. आपल्या भाषणात त्यांनी मशाल दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. २६ जानेवारीपासून या मशाल दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

पुढे काय करायचं ते नक्की करु, मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पक्षाला जर मला काढायचं असेल तर तो निर्णय पक्षानं घ्यावा असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. एक लक्षात ठेवा पंकजा मुंडे घरात दार लावून बसणार नाही. २७ जानेवारीला मी एक दिवसाचं लक्षणिक उपोषण करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.