महाराष्ट्रात आम्हीच मोठा भाऊ आहोत, असे शिवसेनेने भाजपाला बजावले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला थेट खडसावलंच आहे. भाजपा हा लाचार पक्ष नाही, युतीसाठी याचना करणार नाही. हिंदुत्त्वासाठी एकत्र येणार असतील ते येतील. जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लढू अशी गर्जनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जालना येथील भाजपा कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्री बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून युती होणार की नाही याच्या विविध चर्चा सुरु आहेत. युती देशाच्या विकासासाठी झाली पाहिजे. हिंदुत्त्ववादासाठी एकत्र आलं पाहिजे. ज्यांनी देश लुटला अशा चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे. ज्यांची डोकी हॅक झाली आहेत ते पाकिस्तानशी हातमिळवणी करून काम करत आहेत. त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून युतीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

भाजपा हा लाचार पक्ष आहे असं मात्र कोणीही समजू नये. अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचा हा पक्ष आहे, हा पक्ष कधीही लाचार होऊ शकत नाही. आम्ही शून्यातून जग निर्माण केलं आहे. दोनपासून २८५ वर पोहचलेला हा पक्ष आहे. जे सोबत येणार असतील त्यांना सोबत घेऊ जो येणार नाही त्याच्याशिवाय लढू असे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे.