माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांचा प्रवेश भाजपसाठी डोकेदुखी ठरला असून कॉंग्रेसची पोलखोल करण्यासाठी भाजपवासी झालेले जव्हेरी भाजपच्याच स्थानिक नेत्यांची पोलखोल करीत असल्याने भाजपचे नेते चांगलेच अडचणीत सापडले असून ही डोकेदुखी कॉंग्रेस पक्षातच बरी होती, असे खासगीत बोलून दाखवित आहेत.
कॉंग्रेसचे माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत शुक्रवारी प्रवेश घेतला. मुस्लिम बोहरा समाजाचा सुशिक्षित चेहरा भाजप हवा होता. तिकडे जव्हेरी कॉंग्रेसमध्ये अस्वस्थ होते. अशातच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी गळ टाकला आणि गडकरींच्या जाहीरसभेत जव्हेरी भाजपवासी झाले. याच जाहीरसभेत जव्हेरी यांना भाषणाची संधी देण्यात आली. आता जव्हेरी कॉग्रेस नेत्यांची पोलखोल करतील, असे वाटत असतांना यावेळी जव्हेरी यांनी विधान परिषद निवडणुकीतील किस्सा सांगून भाजपच्या स्थानिक केंद्रीय व स्थानिक नेत्यांचीच पोलखोल केली. विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात असतांना वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातील भाजपचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना भाजप नेते नितीन गडकरी, खासदार हंसराज अहीर व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीच भाजपच्या उमेदवाराला मतदान न करता आपणाला मतदान करा, असे आदेश सर्वाना दिले होते. त्यामुळेच मी विजयी झालो, असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही, तर भाजपा नेते स्वपक्षीय उमेदवाराऐवजी कॉंग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी कसे उभे होते, हे त्यांनी पध्दतशीरपणे रंगवून सांगितले..