विधान परिषदेच्या जागेवर भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते—पाटील यांना संधी देण्याचा ‘शब्द’ पाळला आहे. त्यामुळे मोहिते—पाटील गटात उत्साह संचारला आहे.

महाराष्ट्रातील अनेक राजकीय तालेवार घराण्यांपैकी अकलूजचे मोहिते—पाटील हे महत्त्वाचे घराणे आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात स्वत:चे वलय टिकवून धरलेल्या या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील रणजितसिंह मोहिते—पाटील हे यापूर्वी विधान परिषद सदस्य होते. तसेच काही वर्षे राज्यसभा सदस्यही होते. अभ्यासूवृत्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य आणि घराण्याची पुण्याई या बळावर रणजितसिंह यांनी यापूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये अनेक जबाबदारम्य़ा सांभाळल्या होत्या. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ साली स्थापना झाल्यानंतर रणजितसिंह हे या पक्षाच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साथ दिली होती. परंतु पवार व मोहिते—पाटील यांच्यातील जुनी दुश्मनी पुन्हा उफाळून आली आणि त्यातूनच मोहिते—पाटील यांचे राजकीय पंख छाटण्याचे प्रकार सुरू झाले.

विशेषत: ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते—पाटील यांचे वाढते खच्चीकरण सहन न झाल्यामुळे त्यांचे पुत्र रणजितसिंह हे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ची माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभेची जागा भाजपला जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याची कामगिरीही मोहिते—पाटील घराण्याने बजावली होती. या सर्व घडामोडीत भाजपमध्ये रणजितसिंह यांना मानाचे स्थान देण्याचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार अखेर विधान परिषदेसाठी त्यांना संधी देऊन भाजप श्रेष्ठींनी आपला शब्द पाळल्याचे मानले जात आहे. रणजितसिंह यांना ही संधी देण्यात आल्यामुळे मोहिते—पाटील घराण्याकडून सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातही भाजपची ताकद वाढविण्याचा जोमाने प्रयत्न होणार असल्याचे सांगितले जाते.