करोना काळात बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या पार्श्वभूमीवर बारावीचे निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, आज ३१ जुलै असून आजही निकाल लागणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर या मुद्द्यावरून टीका करण्यात आली आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ३१ जुलैच्या मुदतीची आठवण करून दिली आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडली असून मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी यावर अजून स्पष्टीकरणही दिलेलं नाही हे धक्कादायक असल्याचं ते म्हणाले आहेत.

“लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ!”

केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्वीटमध्ये न्यायालयानं दिलेल्या मुदतीचा उल्लेख केला आहे. “ठाकरे सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाची तमा, ना १२वीच्या विद्यार्थ्यांची काळजी. सर्वोच्च न्यायालयाने १२वीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा असं स्पष्ट केलं होतं. मात्र, ते जाहीर न करून सरकारने न्यायालयाचा अवमान तर केलाच, पण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे”, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

 

“हे तर आणखीन धक्कादायक!”

“ठाकरे सरकारने ३१ जुलैची मुदत पाळण्यासाठी लक्ष केंद्रीत करायला हवं होतं. मात्र, निकालासाठीची मुदत न पाळून महाविकासआघाडी सरकराने विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत आपण किती उदासीन आहोत, हेच दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही हे आणखी धक्कादायक आहे”, असं देखील केशव उपाध्ये यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

 

निकाल अजून लांबण्याची शक्यता!

निकालाबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, की राज्यातील पाऊस, पूरपरिस्थितीमुळे काही भागातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली. नैसर्गिक आपत्ती असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली. मात्र निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पुढील काही दिवसांत निकाल जाहीर करण्यात येईल. त्याबाबतची अधिकृत घोषणा राज्य मंडळाकडून केली जाईल.