News Flash

“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप!

अनिल परब यांनी शेतजमिनीवर नियमांना डावलून रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

“लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम केलं. त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी”, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर अनल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्र देखील सादर केली असून त्यातल्या तरतुदींनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला. तसेच, येत्या शुक्रवारी रत्नागिरीत जाऊन पोलीस तक्रार करणार असून सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अनिल परब यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

काय आहेत आरोप?

अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला. “अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२०मध्ये तीनमजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. अनिल परब यांनी १९ जून २०१९ रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्रकिनाऱ्यावर जागा घेतली. १ कोटींमध्ये ही जागा घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झालं. सगळी कागदपत्रं शेतजमीन म्हणून आहे. पण सातच दिवसांत अनिल परब यांनी २६ जून २०१९ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं. जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचं म्हटलंय. पण तो दाखला दाखवलेला नाही”, असं किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. यावेळी आरोप करताना त्यांनी संबंधित खरेदीखत आणि इतर कागदपत्र देखील पत्रकार परिषदेत दाखवली.

“७ मे २०२१ रोजी तयार केलेल्या कागदपत्रांत ही जागा अजूनही शेतजमीन आहे. पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता, सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊनदरम्यान अनिल परब यांनी १० महिन्यांत रिसॉर्टचं बांधकाम पूर्ण केलं. १० मे रोजी मी स्वत: दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. ११ मे २०२१ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठीचा १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या काळासाठीचा ४ वर्षांचा टॅक्स तलाठीकडे भरला”, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

कच्च्या झोपडीसाठी परवानगी दिली होती…

दरम्यान, कच्च्या झोपडीसाठी दिलेल्या परवानगीची मुदत उलटून गेल्यानंतर तीन मजली रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. “२०१५-१६मध्ये या जागेवर कच्ची झोपडी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यात १२ महिन्यात ते बांधकाम करण्यासंदर्भात नमूद करण्यात आलं होतं. पण त्यांनी ते केलं नाही. २०२०च्या सुरुवातीपर्यंत तिथे कोणतंही बांधकाम नव्हतं. त्यामुळे अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. शुक्रवारी मी अधिकृत तक्रार देणार आहे. सोमवारी राज्यपालांना भेटून मंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहे”, असं किरीट सोमय्यांनी यावेळी सांगितलं.

 

काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला होता. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब यांचाही नंबर लागणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:35 pm

Web Title: bjp kirit somaiya allegations on shivsena leader anil parab pmw 88
Next Stories
1 मोदी सरकार ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर, म्हणाले…
3 महाराष्ट्रालाही तौतेचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का? – नवाब मलिक
Just Now!
X