बुधवारी ११७ विरुद्ध ९२ च्या फरकाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं. या विधेयकावर दिवसभर चर्चा सुरु होती. दरम्यान, ११७ मतं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने पडली. तर या विधेयकाच्या विरोधात ९२ मतं पडली. मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. यावरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल! असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

देशातील तमाम हिंदूसाठी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. त्यांची सेना आज या देशात येणारे आणि इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा हक्क नको?अशी भूमिका नागरिकत्व सुधारणा विधेयकावर घेते. रोज नवे युटर्न..सत्तेसाठी पहा कशी कमाल..काँग्रेसचे हमाल दे धमाल! अशा आशयाचं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
तसंच त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेतही मंजुर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं आहे. भाजपामुळे जगभारतील हिंदूंना भारत हे आश्रयस्थान झालं आहे. काहींचा विरोध होता. काहीजण विरोधी मतदान करुन सभागृहात बसले. काहीजण “जनपथला” घाबरुन सभागृहातून पळाले..? आणि फसले! असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यसभेत शिवसेनेने मतदान न करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य बदल आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी शिवसेनेचं समर्थन केलं. या विधेयकासंदर्भात शिवसेनेने प्रश्न विचारले होते, त्याची समर्पक उत्तरं न मिळाल्यानं या विधेयकाला समर्थन वा विरोध करणे चुकीचं ठरले असतं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांनी नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिल्याने दिल्लीतील काँग्रेसचे नेते कमालीचे नाराज झाले होते. विधेयकाला थेट विरोध करायचा नसेल तर निदान शिवसेनेनं लोकसभेत गैरहजर तरी राहायला हवं होतं, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं. राज्यातील महाविकास आघाडीच्या विरोधात असणारे प्रामुख्याने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेनेला ‘समज’ देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याचं समजतं.