News Flash

ATKT असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

शेलार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

करोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर भाष्य केलं. यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सवाल उपस्थित केले आहेत. एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.

“पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे हित आणि आरोग्याची काळजी घेणे योग्यच आहे. त्यासोबत त्यांचे शैक्षणिक आरोग्यही सांभाळले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वेळीच देऊन सरकारने विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करावे ही आमची विनंती आहे,” असं शेलार म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवलं आहे.

आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना? ATKT असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितलं.

शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न

 • राज्यातील विद्यापीठांमध्ये ATKT असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? ATKT चे विद्यार्थी हे नापास गृहीत धरले जातील. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे याचा विचार केला आहे का? राज्यात सर्व विद्यापीठ मिळून ४० टक्के विद्यार्थी हे ATKT असलेले आहेत.
 • अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुस-या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुस-या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का?
 • जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? याही प्रवेश परीक्षा रद्द करणार काय? (लॉ, बी.एड. प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.)
 • हा निर्णय पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणा-या विद्यार्थ्यांना सुध्दा लागू आहे का?
 • अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत कुलगुरुंच्या समितीने परीक्षा घेणे शक्य नाही असे म्हटले होते काय?
 • काही विद्यापीठांमध्ये पहिल्या व दुस-या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेतल्या जातात. अंतिम वर्षांच्या दोन सेमिस्टरच्या परीक्षा हे विद्यापीठ घेते. त्यामुळे महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांवरच कदाचित विद्यार्थ्याला पदवी मिळेल.
 • पुढील शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम कधी सुरु होणार?
 • जर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये गुण सुधारणेसाठी (Class Improvement) परीक्षा देणार असतील तर या गुण सुधारणेचा विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फायदा होणार का? देशातील अन्य विद्यापीठांचे पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम तोपर्यंत सुरु झाले असतील तर या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.
 • जर Class Improvement च्या गुणांचा फायदा विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर शैक्षणिक वर्ष डिसेंबर किंवा जानेवारीत सुरु करणार काय?
 • मागील वर्षाच्या सरासरी गुणांवर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता देणार काय?
 • राज्याबाहेरील विद्यापीठांमध्ये तसेच परदेशातील विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्या संधी नाकारल्या जाणार नाहीत ना? याचा विचार केला आहे का?
 • बार कौन्सिल ऑफ इंडिया, फार्मसी कौन्सिल, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरसारख्या पार्लमेंट अॅक्टने स्थापन झालेल्या शिखर संस्था विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी लागणारा परवाना देतील काय?
 • बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच नामांकित फर्ममध्ये तसेच समाजामध्ये सरासरी गुणांमुळे विद्यार्थ्यांकडे वेगळ्या नजरेने (कोरोना पदवी) पाहिले जाईल काय?
 • विद्यापीठाच्या स्वायत्ततेमध्ये हा सरकारी हस्तक्षेप नाही काय?
 • विद्यापीठातील सर्व शैक्षणिक घटकांनी एकत्रित विचार करुन निर्णय घेणे योग्य ठरले नसते काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 7:58 pm

Web Title: bjp leader ashish shelar writes letter to shiv sena cm uddhav thackeray asked questions about students jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वर्धेकरांना काही काळ जिल्ह्यातील भाजीपाल्यावरच राहावं लागणार अवलंबून
2 राज्यात मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
3 पालघर : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी औद्योगिक, व्यापारी संस्था राहणार बंद
Just Now!
X