मुंबईत काल रविवारपर्यंत करोनामुळे १,३९५ रुग्णांचे मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती महापालिका व राज्याचा आरोग्य विभाग सांगत असला तरी यात करोनाची लागण असलेल्या ४५१ रुग्णांची माहिती ‘करोना मृत्यू’ म्हणून नोंदविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याशिवाय पालिकेच्या ‘डेथ ऑडिट कमिटी’पुढे गेल्या आठवड्यापर्यंत सादर न झालेल्या सुमारे ५०० प्रकरणांचा विचार केल्यास मुंबईतील सुमारे ९५० मृत्यू हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची भीती पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

“४५१ करोना मृत्यूंची नोंद नाही. ही महापालिका आणि राज्य सरकारची जीवघेणी बनवाबनवी,” असं म्हणत भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून त्यांच्यावर टीका केली.

आणखी वाचा- “महाराष्ट्रात राहुन गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा…”; जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं

काय आहे प्रकरण?

मुंबईत करोनाचे रुग्ण सापडू लागल्यावर सुरुवातीला बहुतेक रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात होते. त्यावेळी चाचण्या करण्याची यंत्रणा प्रामुख्याने कस्तुरबा व केईएम रुग्णालयात होती. हळूहळू मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली व मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले. यातूनच हे मृत्यू करोनाचे दाखवायचे की नाही, हा संभ्रम पालिका प्रशासनापुढे निर्माण झाला. आज मुंबईत करोनाचे एकूण रुग्ण ५८,२२६ आहेत तर करोना मृतांची संख्या १,३९५ आहे. राज्यात करोना रुग्ण १,०७,९५८ आहेत तर मृत्यूंची नोंद ३,३९० दाखवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने त्यांच्या रुग्णालयातील ४५१ करोना रुग्णांची नोंद ‘करोना मृत्यू ‘ दाखवली नसल्याचा मुद्दा आता आरोग्य विभागाने उपस्थित केला आहे. यातून हे मृत्यू का दडविण्यात आले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभाग व मुंबई महापालिका यांच्या मध्ये या ४५१ करोना मृत्यूंवरून शीतयुद्ध निर्माण झाले असून साधारण एप्रिलच्या सुरुवातीपासूनचे हे मृत्यू असल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ डॉक्टरने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

सविस्तर वाचा – धक्कादायक: मुंबईतील ४५१ करोना मृत्यूंचं गूढ; पालिकेची भूमिका वादाच्या भोवऱ्यात!

याच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तसेच पालिकेतील ‘डेथ ऑडिट कमिटी’तील काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ‘आयसीएमआर’ व ‘जागतिक आरोग्य संघटना’ या दोघांनीही करोना मृत्यू कशास म्हणावे याची सुस्पष्ट व्याख्या केली आहे. ‘आयसीएमआर’च्या याबाबतच्या नियमावलीतील ७.१ मध्ये अपमृत्यू, अपघात मृत्यू व आत्महत्या वगळता सर्व मृत्यू हे करोना मृत्यू म्हणून घोषित करणे बंधनकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही अशीच सुस्पष्ट व्याख्या केली असताना मुंबई महापालिकेने तब्बल ४५१ मृत्यू हे करोना मृत्यू म्हणून दाखवलेले तर नाहीच शिवाय हे मृत्यू करोनाचे नाहीत, असे आरोग्य विभागाला ८ जून रोजी एका मेलद्वारे कळवून वादाला उघड तोंड फोडले आहे.

महापालिकेने ८ जून रोजी आरोग्य विभागाला पाठवलेल्या मेलबरोबर सर्व मृतांची नावे असून यातील २० मृत्यू पावलेल्यांची नावे दुबार आली आहेत तर तिघांचे मृत्यू हे अपमृत्यू असल्याने हे २३ मृत्यू वगळता सर्व मृत्यू हे करोनाचे मृत्यू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पालिकेने पाठवलेल्या इ-मेलची प्रत लोकसत्ताकडे उपलब्ध आहे.