राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे अस्तित्व ठळकपणे दिसावे, यासाठी पक्षाचा राजकीय कार्यक्रम घेऊन प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेले लहान कारागीर, असंटित कामगार, शेतमजूर यांना न्याय योजनेंतर्गत मदत करण्याचा ५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीकेचा बाण सोडला आहे. “काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटून ‘न्याय’ योजनेसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज मागणार ही धुळफेक आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

“काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटून ‘न्याय’ योजनेसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज मागणार ही धुळफेक आहे. राज्यपाल नियुक्त जागांचे शिवसेना ५ राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेस ३ ऐवजी समान वाटपाची मागणी करणार ही बातमी आहे. कही पे निगाहे…,” असं भातखळकर म्हणाले. त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.

प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेले लहान कारागीर, असंटित कामगार, शेतमजूर यांना न्याय योजनेंतर्गत मदत करण्याचा ५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- “बाबुभैया? ये क्या चल रहा है?”; आशिष शेलारांचा सरकारवर ‘हेराफेरीचा’ आरोप

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने गरिबांच्या खात्यात दर महिना, ठराविक रक्कम जमा करण्याच्या न्याय योजनेचा गाजावाजा केला होता. आता टाळेबंदीमुळे गरीब वर्गाला मदत करण्यासाठी ही योजना लागू करावी, अशी पुन्हा मागणी पुढे आली आहे. त्यानुसार राज्यातील कष्टकरी, असंघटित कामगार, शेतमजूर यांच्या खात्यात किमान पुढील तीन महिने ७ हजार ५०० रुपये जमा करावेत, असा सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सादर के ला जाणार आहे. सरकारच्या वतीनेच राज्यात ही न्याय योजना राबवावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सांगण्यात आले.