भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नाही असं मत मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केलं होतं. तसंच परिवहन मंत्री अनिल परब यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदच आभासी होती, असं म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडीची समस्या आम्ही समजू शकतो. त्यांच्याकडे दोनच पर्याय आहेत. अकार्यक्षमतेमुळे आम्ही राज्याला विनाशाच्या खाईत लोटले असल्याचे मान्य करणे किंवा रेटून खोटे बोलणे. पहिला पर्याय स्वीकारण्याइतका प्रामाणिकपणा त्यांच्यात नाही, त्यामुळे खोटारडेपणा सुरू आहे,” असं म्हणत भातखळकरांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले होते पाटील?

“भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे. मात्र त्यात तथ्य नाही,” असंही जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. “नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसं झालं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही,” असा टोलाही पाटील यांनी लगावला.

काय म्हणाले होते परब?

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत,” असा टोला परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत लगावला होता. आभासी चित्राला आम्ही थेट उत्तर देत आहोत असं परब यांनी म्हटलं होतं. “सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असं केंद्राने सांगितलं होतं. मात्र तसं काहीही नाही असंही परब यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला कर्ज घेण्यासाठी कुणीही सल्ले देऊ नये असंही परब म्हणाले होते.