राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोनाशी निकराने लढा देत आहे, त्याला यशही मिळत आहे. तरीही भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून, करोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसे अपयशी ठरले आहे, अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता. दरम्यान, यावरून आता भाजपानं त्यांच्यावर टीका केली आहे. “कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडतायत,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे.

“कार्यक्षमतेमुळे राज्याला करोना क्रमवारीत प्रथम क्रमांकावर नेणारे आता विरोधकांवर खापर फोडत आहेत. संकटाचा मुकाबला करण्याची धमक नाही. लोकांच्या वेदना समजण्याइतपत संवेदनशीलता नाही. झेपत नाही हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही. मात्र विरोधकांना दोष देण्याचा निलाजरेपणा मात्र पुरेपूर आहे,” असं म्हणत भातखळकरांनी जयंत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विटरवून जयंत पाटलांवर हल्लाबोल केला.

आणखी वाचा- भारत एकसंघ दिसावा म्हणून आम्ही मोदींचं ऐकलं पण… : जयंत पाटील

काय म्हणाले होते जयंत पाटील?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार करोनाशी निकराने लढा देत आहे, त्याला यशही मिळत आहे. तरीही भाजपचे नेते सतत राज्यापालांना भेटून, करोना नियंत्रित ठेवण्यात सरकार कसे अपयशी ठरले आहे, अशी टीका करून महाराष्ट्राला बदनाम करीत आहेत, असा आरोप जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला होता.

“राज्यपालांकडे सारखे जाऊन, त्यांना त्रास देण्यापेक्षा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नाला पाठिंबा द्या, या लढाईत प्रत्यक्ष सहभागी व्हा,” असा सल्लाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.”राज्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्याही चिंताजनक आहे, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर आहे, या सर्व आघाडय़ांवर राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला असून, सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जयंत पाटील यांनी बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या आरोपांचे खंडन केले.