शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ईडीनं ताब्यात घेतल्याचं समोर आलं होतं. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच ते कायम घरी का बसलेले असतात याचा उलगडा झाला असं म्हणत भातखळकर यांनी टोलाही लगावला आहे.

“कंगना आणि अर्णब गोस्वामी प्रकरणी पोलीस दलाचा दुरुपयोग करणारे राज्यातील ठाकरे सरकार ईडीच्या कारवाईवर काय म्हणून कोकलते आहे? हवालाचे घपले झाले असतील तर सगळा मामला समोर येऊ दे. काही काळेबेरे नसेल तर इतका थयथयाट कशाला?,” असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

“काय प्रॉब्लेम आहे ठाकरे सरकारचा? ड्रगवाल्यांवर कारवाई केली तरी यांना त्रास होतो, हवाला आणि काळ पैसा प्रकरणी कारवाई केली तरी खाली वर होतात. मग कारवाई काय फक्त सॉफ्टटार्गेट असलेल्या पत्रकार आणि कंगनासारख्या अभिनेत्रीवर व्हावी का?,” असंही ते म्हणाले. ठाण्यात लागलेल्या आगीच्या झळा मुंबई पर्यंत पोहचतील ही भीती असावी काय? पण चिंता कशाला? कायद्यापेक्षा कोणी मोठे नसल्याचंही भातखळकर यांनी नमूद केलं.