महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करत असतानाही हिंदुत्व सोडलेले नाही असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत असताना दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजनास्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीकेचे बाण सोडण्यात आले होते. दरम्यान, भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरू शिवसेनेला टोला लगावला.

“शिवसेनेवर टीका केली तर उत्तर द्यायला शिवसेना नेते नसले तरी काँग्रेसवाले तात्काळ हजर असतात. भ्रष्टाचाराबाबत दोन्ही पक्ष एकमेकाला वरताण आहेत, फरक फक्त भगव्यामुळे होता. आता शिवसेनेने भगवा गुंडाळल्यानंतर शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायला काय हरकत आहे?,” असा सवाल भातखळकर यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्लाबोल केला.

आणखी वाचा- अजान स्पर्धेच्या आयोजनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांचा खुलासा; म्हणाले…

… त्यानंतर सकपाळ यांचा खुलासा

विरोधकांनी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी खुलासा करत अजान स्पर्धेशी आपला संबंध नाही असा खुलासा केला. “मुंबादेवी विधानसभेतील ‘फाऊंडेशन फॉर यू’ नावाच्या संस्थेचे पदाधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी अजानची स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केली होती. मी त्यांना सदर स्पर्धा घेण्यासंदर्भात करोनाविषयक नियम अवगत करुन दिले. तसंच सदर स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित केल्यास करोना विषयक नियमांची पायमल्ली होईल हेदेखील सदर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले व सदर स्पर्धा खुल्या प्रकारे आयोजित करण्यास विरोध दर्शवला. मात्र यास शेवटचा पर्याय म्हणून ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यास सुचवलं आणि शुभेच्छा दिल्या,” असा खुलासा पांडुरंग सकपाळ यांनी केला आहे.

काय म्हणाले होते सकपाळ?

“अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं होतं.