अपेक्षे प्रमाणे मुखपत्रातून आज पुन्हा पंतप्रधानांची ‘आरती’ सुरू झाली आहे, असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीय मधून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तसंच “रघुराम राजन दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने आता त्यांना पद्धतशीर खोटं पाडलं जाईल,” असं म्हणत सरकारवर टीका केली होती. यावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.

भारतात किमान १० कोटी लोकांना रोजगार गमवावा लागेल, असे रघुराम सांगतात व हे धक्कादायक आहे, पण रघुराम हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे पाडले जाईल व सर्व काही आलबेल आहे, असे ढोलताशे वाजवले जातील. त्याने परिस्थिती बदलणार आहे काय? असं म्हणत शिवसेनेनं केंद्रावर निशाणा साधला होता. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून शिवसेवर टीका केली आहे. “अपेक्षेप्रमाणे मुखपत्रातून आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आरती’ सुरू झाली आहे. रघुराम राजन, राहुल यांच्या नथीतून तीर चालवले गेले. स्वाभाविकच आहे. जो है पप्पू के यार, कैसे करे मोदीजी से प्यार?,” भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

आणखी वाचा- रघुराम राजन सरकारधार्जिणे नसल्यानं त्यांना खोटं पाडलं जाईल; शिवसेनेची टीका

काय म्हटलं आहे अग्रलेखात?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्याशी डिजिटल’ माध्यमातून संवाद साधला. हा संवाद जनतेलाही ऐकता आला हे बरे झाले. लॉकडाउन नंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक परिस्थितीची दुसरी परखड बाजू यानिमित्ताने समजून घेता आली. कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉक डाऊन अवस्थेत गोरगरीब भरडला गेला आहे. त्याचे भविष्य अधांतरी आहे. गोरगरीबांना मदत करण्यासाठी सरकारने ६५ हजार कोटी रुपये खर्च करणे आवश्यक असल्याचे मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे मत, त्यांनी केलेल्या चर्चा याची खिल्ली उडवता येणार नाही. लॉकडाउनमुळे देशावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. त्यात सगळ्यात हाल होणार आहेत ते गोरगरीबांचे असे रघुराम राजन म्हणतात. मुळात आज जी गरिबीची सरकारी व्याख्या आहे ती लॉक डाऊननंतर बदलणार आहे.

या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे अमर्याद काळापर्यंत लॉक डाऊन चालू ठेवणे अर्थव्यवस्थेला महागात पडेल. सरकारला नियमांच्या चौकटी मोडून काम करावे लागेल व सत्ता, निर्णयाचे अधिकार आज आहेत तसे एका दोघांच्याच मुठीत न ठेवता त्याकडे सामुदायिक पद्धतीने पाहावे लागेल. पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत, पण आता आभाळच फाटले आहे. हे फाटके आभाळ फक्त एकविचारी लोकांची तुतारी फुंकून शिवता येणार नाही.