News Flash

मोदींमुळे नाही तर राज्यात उद्धव यांच्या सूडबुद्धीमुळे आणीबाणी; अर्णब अटकेवरुन भाजपा नेत्याचा टोला

"मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या..."

‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झालेत. या अटकेनंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही अर्णब यांच्या अटकेवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा आधार घेत भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार..”, असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी अर्णब यांना पोलिसांनी अटक केल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्टही पोस्ट केला आहे.

सुप्रिया सुळे नक्की काय म्हणाल्या होत्या?

मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे असं चित्र आहे असं म्हणत कांजूर कारशेडच्या जागेवरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर मंगळवारी निशाणा साधला होता.  “कांजूरमार्गच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक आहे. ती जमी महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे अधिकार काढून घेण्याचं काम करतं आहे. त्यांच्या कृतीतून हेच दिसतंय हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. भाजपाचे नेते कोणत्या आधारावर आमच्यावर टीक करत आहेत? जमीन महाराष्ट्राच्या विकासासाठीच वापरली जाते आहे. या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडू अशी भाषा मी कधीच ऐकलेली नाही. सत्ता नसल्यामुळे भाजपाच्या नेत्यांना काही सुचत नाही. त्यामुळे ते बिचारे असं वागत असतील. कदाचित त्यांचा समतोल बिघडला असावा” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:16 am

Web Title: bjp leader atul bhatkhalkar slams thackeray government over arnab goswamy arrest scsg 91
Next Stories
1 अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या
3 शिवसेना आमदाराचा अमृता फडणवीस यांना टोला; म्हणाल्या, “हा प्रश्न देवेंद्रजींना…”
Just Now!
X