News Flash

“महाराष्ट्राच्या ‘वाघा’ला घरच्यांनीच मरतुकडा म्हणणं म्हणजे…”; भाजपाची बोचरी टीका

उद्धव ठाकरेंवर भाजपाच्या भातखळकरांनी थेट साधला निशाणा

दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता जवळपास महिना होत आला. कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतीविषयक कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना विरोधी पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंद पाळण्यात आला. विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन आले. काँग्रेस या कायद्यांना विरोध करणाऱ्या दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र सरकारदरबारी प्रस्तुत केले. एवढ्या साऱ्या गोष्टी घडूनही सत्ताधारी मोदी सरकारवर विरोधकांना म्हणावा तसा दबाव टाकता आलेला नाही. या अपयशाचं खापर शिवसेनेने काँग्रेसच्या माथी फोडलं आहे. याच मुद्द्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

‘सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. प्रियंका गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, ठाकरे सरकार यांना काम करू दिले जात नाही. त्यांची अडवणूक होत आहे. त्याला कारण मरतुकड्या अवस्थेत पडून राहिलेला विरोधी पक्ष!’, अशा आशयाचा अग्रलेख आज सामनातून प्रकाशित झाला. या मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टिपण्णी केली. “दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले ८ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय. त्यालाही घरच्यांनीही ‘मरतुकडा’ म्हणावं हे जरा अतिच नाही का?”, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.

दरम्यान, सामनाच्या अग्रलेखात विरोधी पक्षांच्या अपयशाचं खापर काँग्रेसवर फोडण्यात आलं आहे. “दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाबाबत दिल्लीतील सत्ताधारी कमालीचे बेफिकीर आहेत. सरकारच्या या बेफिकिरीचे कारण देशातील विस्कळीत, कमजोर झालेला विरोधी पक्ष आहे. निपचित पडलेल्या विरोधी पक्षाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. सरकारच्या मनात विरोधी पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. राहुल गांधींच्या विधानांना काँग्रेसही गांभीर्याने घेत नाही, असे कृषी मंत्री नरेंद्र तोमर म्हणाले. आपल्या सर्वोच्च नेत्यांची अशी जाहीर चेष्टा करण्याचे धारिष्ट सत्ताधारी का दाखवतात? यावर काँग्रेसने वर्किंग कमिटीत चर्चा करणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांची चेष्टा करणाऱ्या कृषी मंत्री तोमर यांनाही देशातील शेतकरी गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती आहेच. मात्र तरीही सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली आहे, हा आक्षेप उरतोच”, असे मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे.

——–

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 11:06 am

Web Title: bjp leader atul bhatkhalkar slams uddhav thackeray sanjay raut sarcastic jokes rahul gandhi pm modi farmer protest vjb 91
Next Stories
1 अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मसाज करणारे आंदोलक यापूर्वी पाहिले नाहीत : प्रवीण दरेकर
2 युपीएकडे मोदींसारखे नेतृत्व आणि अमित शाह यांच्यासारखे राजकीय व्यवस्थापक नाहीत – शिवसेना
3 ईडीच्या नोटीशीवर एकनाथ खडसेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X