विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची एकमेव जागा मिळाली. नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या पराभवानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिलं आहे.

“या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळं चित्र निर्माण होत नाही. असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला. या निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला. पुणे पदवीधर, मराठावाडा पदवीधर आणि अप्रत्यक्षरित्या अमरावती शिक्षक मतदार संघात त्यांना विजय मिळवता आला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचं साफ दिसतंय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

आणखी वाचा- “म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…”; गावरान शैलीत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

आणखी वाचा- एकही जागा न जिंकलेल्या शिवसेनेनं आत्मपरीक्षण करावं – फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेा टोला लगावला. “नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.