राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर १०५ जागांवरून टीका केली होती. शिवसेना सोबत नसती, तर भाजपाच्या ५० जागा निवडून आल्या असत्या, असं पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी निवडणुकीच्या निकालावरून केलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगवेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला २० व काँग्रेसला १० जागा मिळाल्या असत्या,” असं पाटील म्हणाले.
आणखी वाचा- …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना पवार यांनी भाजपानं जिंकलेल्या जागांविषयी भाष्य केलं होतं. त्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना पाटील म्हणाले, “शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदार, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रशासनाला हे सरकार ५ वर्षे टिकणार आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत सरकार पाडून दाखवा, असं म्हणत आहेत. पण सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. तुम्ही वेगळे लढला असता, तर राष्ट्रवादीच्या २० आणि काँग्रेसच्या १० जागा निवडून आल्या असत्या. एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि आमच्या एकट्याच्याच १०५ निवडून आल्या आहेत,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आणखी वाचा- …म्हणून सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध फडकवलं बंडाचं निशाण
सचिन पायलटांबद्दल दोन दिवसात स्पष्ट होईल…
राजस्थानमध्ये घडत असलेल्या घटनेवरही पाटील यांनी भूमिका मांडली. “त्या पक्षातील आमदारांना वा नेत्यांना आपला पक्ष कुमकुवत वाटत असेल. त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास द्यायला त्यांचा पक्ष कमी पडला असेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असेल. त्यामुळे सचिन पायलट भाजपामध्ये आले की नाही, हे एक दोन दिवसांत स्पष्ट होईल,” असंही पाटील यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 3:46 pm