शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये ईडीचं पथकाने शोधमोहिम सुरु केली. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं. ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. या प्रकरणावरून आज दिवसभर राजकीय वातावरण बरंच तापल्याचं दिसलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना भाजपाला लक्ष्य केलं. त्यानंतर त्यांच्या आरोपांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं.

“उद्या उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘उठा’ व्हायला लागला तर…”

“प्रताप सरनाईक हे शिवसनेचे जबाबदार आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याबाबत अशा पद्धतीने सुडाचं राजकारण केलं जातंय ही बाब निंदनीय आहे. ‘ईडी’ने धाड टाकली किंवा काहीही झालं तरीही आमचे नेते अशा प्रकारच्या धाडींमुळे कोणालाही शरण जाणार नाहीत. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) छापेमारी सुरू करण्याऐवजी भाजपने समोर येऊन लढावे”, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले होते.

शरद पवारांची सचिन तेंडुलकरशी तुलना करणाऱ्या ट्विटला निलेश राणेंचं उत्तर, म्हणाले…

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. “सक्तवसुली संचालनालयाची कारवाई हा त्या खात्याचा दैनंदिन कामकाजाचा भाग आहे. त्या खात्याने कोणत्या ठिकाणी कोणती कामे करावीत हा त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचा प्रश्न असतो. त्यामध्ये भाजपचा काहीही संबंध नाही. पण काहीही झाले की भाजपच्या नावाने टीका करणे हे आता केंद्रातील विरोधकांचे कामच बनले आहे”, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

“ठाण्यातील शिवसेनेच्या सगळ्याच आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले”

माजी खासदार निलेश राणे यांनीही या प्रकरणी मत व्यक्त केले. “ईडी ही सरकारची एजन्सी आहे. त्यांना काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणूनच ही कारवाई केली जात आहे. जर प्रताप सरनाईक यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या नसतील, तर त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. सरकारची एजन्सी कोणाला काहीतरी वाटतं म्हणून काम करत नाही. त्यांच्याकडे काही माहिती आली असेल किंवा तक्रार आली असेल, म्हणून ही कारवाई केली जात असणार”, असे मत त्यांनी व्यक्त केले.