गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या निशाण्यावर आहेत. पाटील या दोघांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा औरंगाबाद दौऱ्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. करोनाची तिसरी लाट येईल की नाही, हे सांगायला मी उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर किंवा संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच करोना फक्त उद्धव ठाकरे यांच्याशीच बोलतो, असंही ते म्हणाले.

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत होते. पहिली लाट संपली असे वाटायला लागताच दोन-तीन महिन्यात दुसरी लाट आली आणि पुन्हा सगळं ठप्प झालं. शाळा-महाविद्यालये, रोजगार, उद्योगधंदे सगळं पुन्हा बंद झालं. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दुसरी लाटदेखील ओसरली आहे. बंद झालेले राजकीय जीवन देखील पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आता इतर व्यवहार पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असंही पाटील म्हणाले.

तसेच देशभरात ६५ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तरीही राज्य सरकार मात्र केंद्र सरकारलाच दोष देतंय. एकीकडे देशभरात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाल्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही, असा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू असल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान करोनाची लाट ओसरली असून जनजीवन सामान्य झालंय, त्यामुळे आता शाळा सुरू करायला हरकत नाही. शाळा बंद असल्याने मुलांच्या जीवनावर परिणाम होतोय. मुलं शाळा विसरू लागली असून त्यांचं मोठं नुकसान होतंय, त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची गरज आहे, असेदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात याव्या, असी विनंती हरिभाऊ बागडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.