सरकारची पूर्वतयारी नसल्याने मराठा आरक्षणाची स्थगिती कायम राहिली अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही ठाकरे सरकारची नाचक्कीच आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. आज न्यायालयात पुन्हा-पुन्हा तेच तेच मुद्दे मांडले गेले. न्यायालयापुढे आज मुकुल रोहतगी यांनी कोणतेही नवे मुद्दे मांडले नाहीत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. जेव्हा पुनर्विचार याचिका दाखल केली जाते तेव्हा नवे मुद्दे मांडायचे असतात. मागच्या वेळी जे मुद्दे मांडले तेच आज पुन्हा मांडले गेले म्हणूनच यावरची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता जानेवारीत सुनावणी होणार असल्याने मराठा समाजापुढे मोठा अंधार निर्माण झाला आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आज मराठा आरक्षणावरची स्थगिती सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. त्यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या बाबतीत राज्य शासन गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. इतकी महत्त्वाची सुनावणी असतानाही एकही मंत्री, महा अधिवक्ता हे दिल्लीत पोहोचले नाहीत. सुनावणीच्यावेळी वकिलांनी मांडणी करण्यासाठी पुराव्यांची भरभक्कम माहिती द्यायला शासन देण्यात कमी पडले. सुनावणीवेळी न्यायालयाने ‘जुनेच मुद्दे मांडत आहात’ असे ताशेरे ओढले. हा प्रकार दुर्दैवी आहे,अशी टीका त्यांनी केली. ३२ टक्के मराठा समाजाला आरक्षणाच्या चौकटीत कसे बनवता येते हे साधार पटवून दिले पाहिजे. पण याबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. या चुका पुढील सुनावणी टाळल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.