राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषयावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. “मी आणि वडेट्टीवार बैठकीदरम्यान एकत्र होतो. ते मला ऑफ द रेकॉर्ड एक गोष्ट म्हणाले. ती आता ऑन रेकॉर्ड आणायला काही हरकत नाही. त्यांचं मराठा समाजाप्रती मोठं मनही असू शकेल. आमचा मराठा समाजाला विरोध नाही उलट तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही? जसा अ, ब, क, ड असे प्रवर्ग आहेत, तसा आणखी एक वर्ग वाढवू आणि तुम्ही वाढीव आरक्षण घ्या,” असं वडेट्टीवार म्हणाल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. जर आपण खोटं बोलत असू तर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण द्यावं. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशज आहे. मी या नात्यानं सांगतो की ही त्यांची वक्तव्य आहेत असंही ते म्हणाले.

“तुम्ही जे बोलला ते तुमचं मोठं मन आहे. परंतु आपण सामाजिक मागास आहोत हे सिद्ध झालं आहे. आपलं आरक्षण हे एसईबीसी आहे आणि आपण त्यावरच लक्ष देऊ,” असं त्यांना सांगितलं असल्याचं संभाजीराजे म्हणाले. “जातीय विषमता वाढू नये. त्यांची बाजूही बरोबर असू शकते,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- ‘एमपीएससी’ परीक्षांबाबत अगोदरच निर्णय घ्यायला हवा होता; हे सरकार दिशाहीन आहे – चंद्रकांत पाटील

इशाऱ्यानंतर एमपीएससी परीक्षा लांबणीवर

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या ‘एमपीएससी’सारख्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे राज्यसभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरुवारी रात्रीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन मराठा समाजाची भूमिका मांडली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी शुक्रवारी तुळजापुरात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. ‘‘मराठा आरक्षणासाठी कोणी तलवारी उपसण्याची गरज नाही, पण वेळ आलीच तर आपण तलवारही उपसू’’, असे विधान संभाजीराजेंनी केलं होतं. त्यानंतर भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही शुक्रवारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करणारा संदेश समाजमाध्यमांवरून प्रसारित केला. मराठा समाज संयमी आणि शांत असला तरी प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो, असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी संदेशात दिला होता.