डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा  मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. आधी पंधरा वर्षे ज्यांचं सरकार होतं ते एक इंचही जागा मिळवू शकले नाहीत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जागा मिळाली त्यावेळी भूमिपूजनही झालं होतं.  तरीही आज इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित करणं, लगेच तो रद्द करणं हे सगळं अनाकलनीय आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काहीही करायचं असेल तर लपूनछपून करु नका राजरोसपणे करा असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.

नेमकं काय घडलं?
इंदू मिल या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी काही मोजक्या लोकांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काही वेळातच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये. येत्या काही दिवसांत सर्वांच्या सहभागाने पायाभरणी होणार असल्याचं स्पष्ट केलं.

फडणवीस काय म्हणाले?

“इंदू मिलची जागा मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच. त्यांच्या हस्ते भूमिपूजनही झालं होतं. त्या कार्यक्रमाला सगळे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर दीड वर्षात बरंच कामही तिथे झालं. तरीही पायाभरणीचा कार्यक्रम पुन्हा आयोजित का करण्यात आला ते अनाकलनीय आहे. बरं जे काही करायचं आहे ते लपूनछपून का करता? राजरोसपणे करा की.. आज तर मंत्रिमंडळातलेही अनेक मंत्री सांगत होते की असा काही कार्यक्रम आहे हे आम्हाला माहितच नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची पायाभरणी पुन्हा करायची असेलच तर लपून कशाला करता? राजरोसपणे तो कार्यक्रम करा. आज जो काही कार्यक्रम ठरला, मग तो रद्द झाला हा विषय काही चांगला नाही. यामुळे सरकारचं हसू होतं बाकी काही नाही. ”