शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. मध्यरात्री सारेच झोपेत असताना दहा नवजात बालकांवर काळाने घाला घातला. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री ही घटना घडली. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आलं. नर्सने दार उघडून बघितलं असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.
या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!”, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे.
या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2021
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्रिशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर कोलाहल माजला. मृत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. या घटनेमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 10:42 am