भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचे वृत्त आहे. जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केल्याचे ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. जमिनीची किंमत सुमारे ३१ कोटी ११ लाख रुपये असताना ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली. महसूलमंत्र्यांच्या कुटुंबीयांनीच रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून भोसरी येथील करोडो रुपयांची जमीन खरेदी केल्याने संशय निर्माण झाला.  या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून सुरु झाला. याप्रकरणी खडसेंची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आणि शेवटी खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. एसीबीने या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात अहवाल सादर केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या अहवालात खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा आणि या खरेदी प्रक्रियेत शासनाचे नुकसान झालेले नाही, असा उल्लेख असल्याचे वृत्तात म्हटले आहे. ‘लोकसत्ता’ने या संदर्भात एसीबीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अहवाल सादर केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, या अहवालात नेमकं काय म्हटले आहे, याचा तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिला.